Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण
पद्मसिंह पाटील सीबीआयच्या ताब्यात
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री व आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेल्या पद्म्सिंह पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात त्यांना अटक होण्याची

 

शक्यता असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय करीत आहेत. या प्रकरणात सीबीआयने गेल्या आठवडय़ात व्यावसायिक सतीश मेंदाडे आणि कल्याणमधील भाजपचा माजी नगरसेवक मोहन शुक्ल या दोघांना अटक केली होती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पद्म्सिंग पाटील यांची त्याचे पुत्र व राज्याचे महसूल राज्यमंत्री राणाजगजितसिंग पाटील यांच्या मंत्रालयासमोरील बी-७ या बंगल्यात कसून चौकशी केली. तीन तासांच्या चौकशीनंतर अधिक चौकशीसाठी त्यांना सीबीआयच्या तन्ना हाऊस येथे नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयने पद्म्सिंग यांचा पनवराजे यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सुतोवाच केले होते.
पवनराजे यांची ३ जून २००६ मध्ये कळंबोली येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यावेळी पवनराजे यांचा चालक समद काझी याच्याही डोक्यात गोळी घालण्यात आली होती. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र तपास पुढे सरकू शकला नव्हता. त्यामुळे पवनराजे यांच्या पत्नी तसेच मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
त्याचवेळी एका दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या पारसमल जैन आणि दिनेश तिवारी यापैकी जैन याने आपल्या जबानीत पवनराजेंच्या हत्येची सुपारी घेतल्याचे कबूल केले होते. या सुपारीपोटी आपल्याला २५ लाख रुपये मेंदाडे याने दिल्याचेही त्याने जबानीत म्हटले होते. याशिवाय पद्म्सिंग पाटील यांच्या आदेशावरून पवनराजे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, असाही उल्लेख त्यात होता. मेंदाडे याच्याशी ओळख मोहन शुक्ल याच्यामुळे झाली आणि आपण पवनराजेंच्या हत्येची सुपारी घेतली. त्यासाठी उत्तर प्रदेशातील बसपाच्या एका खासदाराचा चालक छोटू पांडे याच्यासह दिनेश तिवारीची मदत घेतल्याचेही त्याने सांगितले होते. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाने फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्याचा हात असल्याचेच त्यावेळी सांगितले होते. मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला होता.
उस्मानाबाद येथून खासदार म्हणून निवडून आलेल्या पद्म्सिंग पाटील यांची २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर पवनराजेंबरोबरची दुश्मनी वाढली होती. पवनराजेंमुळे ते फक्त दोन-अडीच हजार मतांनीच निवडून येऊ शकले होते. याशिवाय साखर कारखान्याती घोटाळा बाहेर काढल्याचा राग येऊनच पवनराजेंची हत्या करण्याची सुपारी देण्यात आल्याचे जैन याच्या जबानीत म्हटले आहे.