Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘अफझलखानाचा कोथळा पुस्तकातून हटवला तेव्हा शेपटय़ा का घातल्या?’
उद्धव यांचा दादोजी कोंडदेव विरोधकांना सवाल
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख चौथीच्या पुस्तकातून वगळण्याच्या कृतीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. काही जातीयवादी संघटनांच्या दबावाखाली झुकून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने जातीयवादी संघटनांपुढे शरणागती पत्करली

 

आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे खरे गुरू नाहीत, अशी मागणी लावून धरत काही मराठा संघटनांनी त्यांचे नाव चौथीच्या ‘बालभारती’ पुस्तकातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यांना ठाकरे यांनी खडे बोल सुनावले आहेत. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना इतिहासाच्या ‘शिवछत्रपती’ पुस्तकात ‘अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला’ या वाक्यास आक्षेप घेतला गेला व तो उल्लेखच सरकारने काढला, शिवरायांच्या शौर्यावरच मुसलमानांनी आक्षेप घेतला, तेथेही सरकार नमले. आज दादोजी कोंडदेव यांच्या बाबतीत शौर्य दाखविणाऱ्या मराठा संघटनांनी तेव्हा अफझलखानापुढे शेपटय़ा का घातल्या, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या थडग्याचे जणू स्मारकात रूपांतर होत आहे. गडाच्या पायथ्याशी मोठय़ा जागेवर खानाच्या पिलावळीने अतिक्रमण केले आहे. तेथेही जाऊन शिवरायांच्या नावास जागणारे शौर्य गाजविण्याची हिंमत हे लोक दाखवत नाहीत. महाराष्ट्राचा इतिहास हा शिवरायांच्या नावाने व शौर्यानेच लिहिला गेला. एक-दोन जातीय संघटना आणि त्यांचे टिनपाट पुढारी मागणी करतात म्हणून इतिहासाचा कोथळा काढण्याचा अधिकार सरकारला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी अखेरीस म्हटले आहे.