Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
.. तरीही पोलिसांची सशस्त्र पथके आदेशाची वाट पाहत होती
धवल कुलकर्णी, सागनिक चौधरी आणि वाय.पी. राजेश
मुंबई, ६ जून

ताज महल हॉटेलमध्ये अतिरेकी शिरल्यानंतर हॉटेलच्या प्रवेशद्वारावर दहशतवादविरोधी पथकाच्या एके ४७ अॅसॉल्ट रायफलसह सज्ज असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीममधील १२० पोलिसांसह तीन स्ट्राईकिंग मोबाईल्सवरील १८ सशस्त्र पोलीस, प्रत्येकी पाच पोलीस असलेल्या तीन अॅसॉल्ट मोबाईल तसेच प्रत्येकी चार पोलिसांसह सहा पोलीस ठाण्याच्या मोबाईल हॉटेलच्या

 

तळमजल्यावर आदेशाची वाट पाहत उभ्या होत्या.
२.१० वा. मरीन कमांडोंचे आगमन झाल्यानंतर अतिरेक्यांविरुद्धची कारवाई सुरू झाली. परंतु ते तळमजल्याच्या वर जाऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता एनएसजीचे कमांडो आले. मात्र त्यांची कारवाई प्रत्यक्षात साडेनऊ वाजता सुरू झाली. तोपर्यंत पहिल्या तीन मिनिटांत २० लोक तर नंतरच्या हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह १२ जण ठार झाले. २.३४ वाजता अतिरेक्यांनी खोली सोडल्यानंतर केलेल्या हल्ल्यात ताज हॉटेलचे महाव्यवस्थापक करमबीर कँग यांची पत्नी तसेच दोन मुले ठार झाली होती. ताजमध्ये अतिरेकी शिरल्यानंतर त्यापाठोपाठ उपायुक्त नांगरे-पाटील पिस्तुलधारी शिपायांसह तेथे गेले. त्यांच्यासोबत राज्य विद्युत मंडळाचे दक्षता अधिकारी हेमंत नगराळे तसेच उपायुक्त (विशेष शाखा) राजवर्धन हे सव्र्हिस रिव्हॉल्व्हरशिवाय होते. कामा इस्पितळ येथे अतिरेक्यांशी लढताना गंभीर जखमी झालेल्या अतिरिक्त आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) सदानंद दाते यांना मदत पुरविल्यानंतर अतिरिक्त आयुक्त (गुन्हे अन्वेषण विभाग) देवेन भारती हेही तेथे आले.