Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही - संगमा
नवी दिल्ली, ६ जून/पी.टी.आय.

काँग्रेसमध्ये जाण्याचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी. ए. संगमा यांनी केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दहा वषार्ंच्या कालखंडानंतर काल भेट घेतली. त्यानंतर संगमा काँग्रेसमध्ये परत जाणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा इन्कार करून ते म्हणाले की, मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा

 

प्रश्नच उद्भवत नाही.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांना काँग्रेसमध्ये परतण्याचे निमंत्रण दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याबद्दल विचारले असता श्री. संगमा म्हणाले की, माझ्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो, मी काँग्रेस पक्षात जाण्याचा मुद्दा आमच्या चर्चेत उपस्थित झाला नाही. मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच आहे. सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा संपुष्टात आला असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व वेगळे ठेवण्याची गरज नाही असा युक्तिवाद अनेक काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्याबद्दल विचारले असता संगमा म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्याला स्वत:ची वेगळी ओळख आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा मुद्दा येतोच कुठे?’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वत:चे अस्तित्व वेगळे असून आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीला पाठिंबा दिला असून काँग्रेसला आम्ही सदैव सहकार्य करून आम्ही केंद्रात तसेच महाराष्ट्र आणि गोव्यात काँग्रेसच्या सोबत आहोत, मेघालयामध्ये आमची युती होऊ शकली नाही. काँग्रेसचे काही नेते महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारली असता श्री. संगमा म्हणाले, की असे निर्णय दोन्ही पक्षाचे अध्यक्ष घेतील. कोणाही नेत्यांच्या व्यक्तिगत मतानुसार असे निर्णय होत नसतात असा टोलाही त्यांनी मारला.