Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेघडंबरीवरील पुतळ्यावरून रायगडावर तणाव
महाड, ६ जून/वार्ताहर

किल्ले रायगडावरील मेघडंबरीमध्ये आज शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये स्थानापन्न करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कायमस्वरुपी बसविण्यात आला. तो या जागेवरून अन्यत्र हलविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किल्ले रायगडावर उपस्थित

 

असलेल्या शिवप्रेमींनी दिला.
६ जून या इंग्रजी तारखेप्रमाणे आज किल्ले रायगडावर कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक समारंभ विधीवत पूजा अभिषेक करण्यात येऊन संपन्न झाला. याप्रसंगी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष संदीप जाधव, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, इंद्रजीत सावंत, राम यादव आदी मान्यवरांसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
रायगडावरील दरबार हॉलमध्ये असलेल्या मेघडंबरीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थानापन्न करण्यात आली. त्यानंतर त्यांचा ३३६ वा राज्याभिषेक समारंभ महाराजांचे वंशज आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते विधीवत मंत्रघोषाच्या निनादामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी गडावर आलेल्या हजारो शिवप्रेमींनी जय जयकार करून महाराजांना अभिवादन केले.
रायगडावरील मेघडंबरीत आज स्थानापन्न करण्यात आलेला छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा हा आजपासून कायमस्वरुपी त्याच जागेवर ठेवण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी, मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड यांच्या कार्यकर्त्यांनी केली. गेल्या अनेक वर्षांंपासून शिवप्रेमींची ही मागणी आहे. मात्र त्यावर शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. केंद्रातील पुरातत्त्व विभागाकडूनही सहकार्य दिले जात नाही. यासंदर्भात राज्य व केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत सेवासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी याप्रसंगी मेघडंबरीतील पुतळा हा या जागेवरून हलविण्यात आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी गडावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित शिवप्रेमींचा उत्साह आणि आग्रह पाहून मेघडंबरीमध्ये पुतळा हा कायमस्वरुपी बसविण्यात येत असल्याची घोषणा केली. याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असून त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार माणिकराव जगताप यांनी दिली.