Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

काँग्रेस-राष्ट्रवादीला कळले आघाडीचे महत्त्व!
मुंबई, ६ जून / खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसबरोबर आघाडी करून लढण्याची तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले असतानाच आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा सूर आता बदलला आहे. आघाडी झाल्याशिवाय पुन्हा सत्ता

 

मिळणार नाही, असा इशाराच पवारांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची विचार बळावत चालला आहे. विशेषत: केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रचार समितीचे प्रमुख बाळासाहेब विखे-पाटील यांनी तसे मत मांडले आहे. काँग्रेसचे केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार आज आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विलासराव देशमुख अथवा पृथ्वीराज चव्हाण या केंद्रीय मंत्र्यांनी स्वबळावर लढण्याच्या विषयाला हात घातला नाही. फक्त चव्हाण यांनी, एका पक्षाची सत्ता येण्याचा दिवस लांब नाही, असे मत व्यक्त केले. बहुधा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी आघाडीवर भर दिल्याने स्वबळावर लढण्याची मागणी करणाऱ्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला असावा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आदींनी लोकसभा निवडणुकीत यशामुळे हुरळून न जाता विधानसभा निवडणुकीच्या वेळी गाफील राहू नये, असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध केले.
पवारांनी शुक्रवारी पक्षाच्या निवडक नेत्यांच्या बैठकीत बोलताना आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीत आघाडीला ३८ टक्के तर युतीला ३५ टक्के मते मिळाली आहेत याकडे लक्ष वेधले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागांमध्ये दुपटीचा फरक असला तरी मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. आघाडी करण्याची दिल्लीतील नेत्यांचीही तयारी असल्याचे पवारांनी पक्षाच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले.
काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जिल्हानिहाय आढावा सुरू केला आहे. पवारांनी जिल्हानिहाय आढावा घेताना कोठे कमी पडलो हे नेत्यांच्या निदर्शनास् आणून दिले. लोकसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी नाउमेद न होता कामाला लागण्याचा आदेशच पवारांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे. यामुळेच मराठा आरक्षणाचे तुणतुणे वाजविणाऱ्या नेत्यांना चपराक दिली आहे. कारण मराठा कार्डच राष्ट्रवादीच्या मुळावर आले होते.
विलासरावांची फटकेबाजी
सत्कार समारंभात बोलताना विलासरावांनी सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री चव्हाण व नारायण राणे यांना टोला हाणण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, शरद पवारांच्या विरोधात आम्ही बंड केले. ते बंड फसले असले तरी पवारांनी आपल्याकडे उद्योग हे खाते दिले. आपण उद्योगात माहिर असल्यानेच बहुधा पवारांनी हे खाते दिले असावे. उद्योग खात्यातूनच पुढे आपला प्रवास मुख्यमंत्रीपदापर्यंत झाला. आपल्या मंत्रिमंडळात उद्योग खाते अशोक चव्हाणांकडे होते. पुढे ते मुख्यमंत्री झाले. आता उद्योग खाते असलेल्यांवर चव्हाणांनी लक्ष द्यावे, असे सांगत विलासरावांनी हलकेच नारायण राणे यांना टोला हाणला.