Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

शासनाच्या अनास्थेमुळे मौल्यवान खनिज संपत्तीचा साठा पडून!
प्रसाद रावकर, मुंबई, ३ जून

रेडी येथील तपासणी करण्यात आलेल्या नमुन्याच्या आधारे तेथे प्रतिटनामध्ये ६७ ग्रॅम सोने सापडू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील कोलार येथील सोन्याच्या खाणीतून प्रतिटन चार ग्रॅम सोने निघते. प्रतिटन चार ग्रॅम सोने काढण्यासाठी या खाणीत ६.५ कि. मी. खोल जावे लागत होते. आता ही खाण बंद करण्यात आली आहे. सध्या कर्नाटकातील रायचूर

 

जिल्ह्यातील हट्टी येथील खाणीतून ३.५ कि.मी. खोलीवरून प्रतिटन सहा ग्रॅम सोने काढण्यात येते, तर चित्रदूर्ग येथील खाणीत प्रतिटन तीन ग्रॅम सोने मिळते. देशातील अन्य खाणींच्या तुलनेत रेडी येथे ११ पट अधिक प्लॅटिनमसह सोने मिळते, अशी माहिती अॅड. नंदकुमार पवार यांनी दिली.
सध्या रेडी येथील रेतीची कच्चे लोखंड म्हणून कवडीमोल किमतीत परदेशात निर्यात करण्यात येत आहे. रेडी येथून १९६९ पासून चीन, जपान आणि रुमानीयाला रेतीची निर्यात करण्यात आली आहे. यावर्षी रेडी येथून चीनला ४,७५९७५ टन रेती निर्यात करण्यात आली. येथील रेतीमध्ये प्रतिटन ६७ ग्रॅम सोने सापडत असून ही आकडेवारी लक्षात घेतल्यास या एकाच वर्षांत कच्च्या लोखंडाच्या नावाखाली ३१,८९० किलो खनिजसंपत्ती परदेशात गेली. या खनिजसंपत्तीचा सरासरी भाव १५ लाख रुपये प्रतिकिलो धरला, तर ४७ अब्ज ८३ कोटी ५० लाख रुपयांची खनिजसंपत्ती प्रतिटन एक हजार ते १५०० एवढय़ा कवडीमोल दराने निर्यात करण्यात आली, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील खनिज संपदेमध्ये मोठय़ा प्रमाणावर सोने आणि प्लॅटिनम आढळलेले असतानाही या मौल्यवान संपत्तीचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांत कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने २००४ मध्ये घेतलेल्या पुढाकाराला शासनाकडून थंड प्रतिसाद मिळाल्याने हे मौल्यवान साठे आजही तसेच पडून आहेत.
ही खनिजसंपत्ती राज्याच्या विकास कार्यासाठी हातभार लावणारी आहे. या खनिजसंपत्तीचे संशोधन, सर्वेक्षण करून, त्याचा योग्य तो विनिमय केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भर पडू शकते याची कल्पना असतानाही राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. रेडी परिसरातील रेतीची तर कवडीमोल किमतीत मोठय़ा प्रमाणावर निर्यात करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर लोहखनिज आणि बॉक्साइटचे साठे आढळले आहेत. सावंतवाडी आणि रेडी परिसरात लोहखनिजाच्या खाणी आहेत. या खाणींमध्ये लोहखनिज आणि अ‍ॅल्युमिनिअम सापडते असा समज होता. परंतु या खनिजसंपत्तीमध्ये अ‍ॅल्युमिनिअम आणि लोहखनिज याव्यतिरिक्त अन्य काही मौल्यवान धातूही दडले असल्याचे १९८० मध्ये निदर्शनास आले होते. रेडी येथील खाणीत सोने आणि प्लॅटिनम असल्याचे आढळून आले. दरम्यान, खनिजसंपत्तीच्या संवर्धनासाठी १९९२ मध्ये रेडी परिसरातील खाण बंद करण्यात आली.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, मिनरॉलॉजीस्ट आर. एस. हजारे आणि उदय कुलकर्णी यांनी रेडी व कळणे परिसरातील मातीचे नमुने घेतले होते. या नमुन्यांची तपासणी केल्यावर त्यात सोने आणि प्लॅटिनम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या नमुन्यांची रासायनिक आणि विश्लेषक प्रक्रिया पद्धतीनेही तपासणी करण्यात आली. त्या चाचण्यांमध्येही सोने आणि प्लॅटिनम आढळून आले आहे. तसेच या नमुन्यांची कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील हट्टी गोल्ड माइनमधील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली आहे. तेथील निष्कर्षांमध्येही सोने आणि प्लॅटिनम आढळून आले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, करमाळ आदी तालुक्यांतील खनिजसंपत्तीच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. या चाचणीमध्ये येथील खनिजसंपत्तीमध्ये चांदी, सोने, तांबे आणि प्लॅटिनम असल्याचे आढळले आहे. खनिजसंपत्तीचे हे नमुने जमिनीच्य पृष्ठभागावरून घेण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सोने आणि प्लॅटिनम मिळण्याची शक्यता असून अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. त्यासाठी जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या मदतीची गरज आहे. अ‍ॅड. पवार यांनी काही शास्त्रज्ञांच्या मदतीने मंडळवेढा व हुपरी येथील भट्टीवर फायर अ‍ॅसे पद्धतीने प्लॅटिनम व सोने काढण्याचा यशस्वी प्रयोग केला. मंगळवेढा येथे प्रतिटनातून २० ग्रॅम सोने निघू शकते, असा निष्कर्ष निरनिराळ्या चाचण्यांनंतर काढण्यात आला. या संदर्भात लक्ष घालावे अशी विनंती अ‍ॅड. पवार, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राम ताकवले, तसेच सोलापूर विद्यापीठातर्फे अनेक वेळा राज्य सरकारला करण्यात आली आहे. परंतु शासन दरबारी त्याची योग्य ती दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी आजही ही खनिजसंपत्ती कवडीमोल दराने परदेशात जात आहे. याच खनिजसंपत्तीचा विनियोग करून महाराष्ट्राचा विकास साधता येईल.