Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

वाहतूक नियंत्रण व्यवस्था आधुनिक करण्यात मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

मुंबईच्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेला जागतिक दर्जाचा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला असून या निर्णयांतर्गत मुंबईमध्ये परिसर वाहतूक यंत्रणा (एरिया ट्रॅफिक कंट्रोल) अत्याधुनिक करण्यात येणार आहे. मुंबईच्या रस्त्यावरील महागर्दीतून विनाअडथळा कोणत्याही सिग्नलवर न थांबता आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे कुणाला नाही आवडणार? ही बाब मुंबईत तरी अशक्यप्राय असे आपल्याला वाटेल पण आता काही दिवसातच यामध्ये बदल होऊन

 

मुंबईकरांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
एरिया ट्रॅफिक कंट्रोल पद्धतीमध्ये ठिकठिकाणी जे सेन्सर लावण्यात येतील त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येबाबत अचूक माहिती मिळेल. त्यामुळे सिग्नल असलेल्या प्रत्येक ठिकाणी सध्या जो वेळ निश्चित केलेला असतो तो रस्त्यांवरील प्रत्यक्ष वाहनांच्या संख्येनुसार कमी-जास्त करता येणे शक्य होईल. सध्या प्रत्येक सिग्नलचा वेळ हा निर्धारित केलेला असतो. वाहनांची गर्दी कमी अथवा जास्त असली तरी तो वेळ संपेपर्यंत वाहनांना खोळंबून राहावे लागते. त्यामुळे वेळ वाया जातो. तसेच पुढच्या प्रवासाला विलंब लागतो. नव्या प्रगत वाहतूक नियंत्रण पद्धतीमुळे वाहनांच्या रस्त्यांवरील संख्येनुसार ट्रॅफिक सिग्नलचा वेळ हा आपोआप कमी अथवा जास्त होऊ शकतो. त्यामुळे वाहने किमान ९५ टक्केपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना तसेच न थांबता आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात.
मुंबई विभागातील वाहतुकीचे नियंत्रण जागतिक दर्जाचे व्हावे व त्यामध्ये जगातील सवरेत्कृष्ट कार्यपद्धती अवलंबविणे शक्य व्हावे यासाठी राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना स्पेनमधील बार्सिलोना येथे प्रगत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यता दिली आहे.
परिसर वाहतूक नियंत्रण (एरिया ट्रॅफिक कंट्रोल) या योजनेतर्गत मुंबईच्या वाहतूक सिग्नल प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील २५४ वाहतूक सिग्नलचे नूतनीकरण करण्यात येतील या अनुशंगाने वाहतूक नियंत्रणाचे प्रगत प्रशिक्षण १५ जून ते २ जुलै या कालावधीत स्पेन येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी मुंबई वाहतूक विभागाचे २ अधिकारी व ८ कर्मचारी यांना पाठविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षणासाठी मुंबई वाहतूक विभागाचे २ अधिकारी व ८ कर्मचारी यांना पाठविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण जागतिक बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणांतर्गत १० अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण मुंबईतच पूर्ण झाले आहे. त्यांची निवड मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील या उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित या प्रगत अभ्यासक्रमासाठी करण्यात आली आहे. या प्रशिक्षणांतर्गत स्पेन व पोर्तुगालमधील परिसर वाहतूक नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण केले जाईल व कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला जाईल.
या प्रशिक्षणासाठी सर्वश्री आनंद मुळे आणि तुकाराम पवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वश्री राजेश खुशलानी, योगेश्वर बोडके, सुदेश कदम, शशिकांत पाटील, सचिन चोरगे, उमेश सावंत, मुन्ना सिंग, पोलीस शिपाई आणि संतोष तांडेल, पोलीस हवालदार यांची निवड झाली आहे.