Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

.. तरीही पोलिसांची सशस्त्र पथके आदेशाची वाट पाहत होती
मुंबई, ६ जून

उपायुक्त नांगरे-पाटील यांच्यासह सशस्त्र पोलिसांचा छोटा गट ताज महाल हॉटेलमध्ये शिरला तेव्हा चार अतिरेकी ५५१ क्रमांकाच्या खोलीत १२ मिनिटे तर ६३२ क्रमांकाच्या खोलीत तब्बल दोन तास होते. दोन्ही वेळा नांगरे-पाटील यांना कळविल्याचा दावा हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांकडून केला

 

जात होता. १०.२७ वाजता जेव्हा अतिरेक्यांच्या हालचाली ताजच्या सुरक्षा रक्षकांनी टिपल्या तेव्हा त्याची माहिती नांगरे-पाटील यांना देण्यात आली. मात्र ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’चे विशेष पथक पोहचत असून लवकरत ते ताबा घेतील, असे नांगरे-पाटील यांनी सांगितल्याचे कळते. १२.३८ वाजता चार अतिरेकी ६३२ क्रमांकाच्या खोलीत होते, १२.५३ वाजता त्यापैकी एक बाहेर गेला आणि पुन्हा आला. १.२८ वाजता आणखी एक बाहेर गेला आणि काही वेळाने आला. २.३४ वाजता चारही अतिरेकी बाहेर पडले आणि सहाव्या मजल्यावर त्यांनी हाहाकार माजवला. याबाबतची माहितीही नांगरे-पाटील यांना देण्यात आल्याचा दावा सुरक्षा रक्षकांनी केला होता. त्यावेळी नांगरे-पाटील यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन आणखी कुमक मागविली. मात्र त्यावेळच्या बिनतारी संदेशानुसार, आयुक्त गफूर यांनी नांगरे-पाटील यांना वाट पाहण्यास सांगितले.
याबाबत गफूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नांगरे-पाटील यांनी अतुलनीय धैर्य दाखवले. अतिरेक्यांशी दोन हात करताना त्यांना जिवाचीही पर्वा नव्हती. त्यामुळे लष्कराचे पथक लवकरच तेथे पोहोचत असल्यामुळे विनाकारण धाडस दाखवू नका, असा आपण सल्ला दिला. त्यांच्यासोबत असलेले दोन शिपाई अगोदरच मरण पावले आहेत, असेही त्यांना सांगितले.
अतिरेकी एका खोलीत एकत्र असताना कारवाई का केली नाही, असे विचारल्यावर नांगरे-पाटील म्हणाले की, अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी आम्हाला जे करता आले ते केले. आमच्याकडे एसएलआर, ३०३ रायफल आणि दोन पिस्तुले होती आणि त्याद्वारे साडेसहाशे लोकांचे प्राण वाचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अतिरेकी वरच्या मजल्यावर असल्यामुळे त्यांच्याशी लढणे कठीण होते. तरीही आपण दोनवेळा सहाव्या मजल्यापर्यंत जाण्यास यशस्वी ठरलो. १०.२७ च्या सुमारास अतिरेकी १२ मिनिटे एका खोलीत गेले असण्याची शक्यता आहे. कारण १०.०३ वाजता आपण अतिरेक्यांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे अतिरेक्यांना एका खोलीत आश्रय घेणे भाग पडले असावे. त्यावेळी ताज सुरक्षा रक्षकांनी आपल्याला काहीही सांगितले नव्हते. अतिरेकी दोन तास एका खोलीत होते हे साफ चुकीचे आहे. उलट ओलिसांना बांधून ते त्यांना मारत होते, मध्येच गोळीबार करीत होते, हातबॉम्ब टाकत होते. पावणेबाराच्या सुमारास आपण सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात गेलो. तेव्हा ताजचे सुरक्षा रक्षक आपल्यासोबत होते. त्याच काळात आपण आयुक्तांशी संपर्क साधून माहिती दिली. तेव्हा आयुक्त म्हणाले की, नौदलाचे कमांडो तेथे पोहोचत आहेत तोपर्यंत त्यांना रोखून धरा. आम्ही मेलो तरी अतिरेक्यांना खाली येऊ देणार नाही, असे आपण त्यावेळी आयुक्तांना सांगितले. बिनतारी संदेश यंत्रणेवर हे संभाषण उपलब्ध आहे.