Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘हल्ल्याची माहिती मुख्य सचिवांना विलंबाने मिळाली नाही’
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबतची पहिली बातमी रात्री ९.४० वाजता मुख्य सचिवांना कळल्यानंतर लगेच १० मिनिटांत म्हणजेच ९.५० वाजता ते मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तोपर्यंत त्यांचा संपर्क पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांच्याशी झाला होता. त्यामुळे त्यांना माहिती मिळण्यास विलंब झाला हे वस्तुस्थितीतीला धरून नसल्यााचा

 

खुलासा मुख्य सचिवांचे सचिव सुधार ठाकरे यांनी केला आहे.
‘एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन’ या मालिकेअंतर्गत लोकसत्ताच्या आजच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘मुख्य सचिवांना माहिती देण्यासाठी विलंब’ या वृत्ताबाबत हा खुलासा करण्यात आला आहे. या खुलाशात म्हटले आहे की, सुरुवातीला गँगवॉर किंवा इतर बाब असल्याबाबत संभ्रम होता. परंतु अतिरेकी हल्ला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर मुख्य सचिवांनी हल्ला कोणकोणत्या ठिकाणी झाला आणि त्यासाठी अद्ययावत शस्त्रे व दारूगोळा यांचा वापर होत असल्याची माहितीही घेतली.
उपमुख्यमंत्री पोलीस नियंत्रण कक्षात पोहोचले होते. त्यांच्याशी मुख्य सचिवांचा संपर्क झाला. हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ सचिवांशी संपर्क साधून राष्ट्रीय सुरक्षा बलाची मागणी केली. केंद्रीय पथकाला दिल्लीहून मुंबई येथे येण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन मुंबई येथील आर्मी कमांडंट जनरल हुडा यांच्याशी संपर्क साधून आर्मी कॉलम्स व त्यानंतर लगेच नेव्हल कमांडोची मागणी पावणे अकरा वाजता केली. ही सर्व कारवाई महासंचालक, आयुक्त आणि सहआयुक्त राकेश मारिया यांच्याशी संपर्कात राहून करण्यात आल्याने ताज महल हॉटेल, ट्रायडण्ट, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे येथे आर्मीचे जवान पोहोचले. याशिवाय ताज व ट्रायडण्ड हॉटेलात नेव्हीचे मरीन कमांडो कार्यरत झाले होते, असेही खुलाश्यात म्हटले आहे.