Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

दिल्लीत पकडलेला दहशतवादी मदनीचे जाबजबाब एटीएस घेणार
मुंबई ६ जून/पीटीआय

राज्याचे दहशतवाद विरोधी पथक दिल्लीत अटक करण्यात आलेला महंमद ओमर मदनी याचे जाबजबाब घेण्याची शक्यता आहे, असे आज सूचित करण्यात आले. मदनी हा पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीझ सईद याचा साथीदार असून मुंबईत

 

११ जुलै २००६ रोजी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या संदर्भात त्याचे जाबजबाब घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक के.पी.रघुवंशी यांनी सांगितले की, आम्ही दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याकडून आणखी माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमचे पथक मदनी याचे जाबजबाब घेण्यासाठी पाठवू. मुंबईतील ११ जुलै २००६ रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेत सामील असलेला कमाल अन्सारी याला अटक झाली आहे पण त्याला दहशतवादी कारवायांसाठी भरती करण्यात मदनी याचा पुढाकार होता असे दिल्ली पोलिसांनी मदनी याला पोलीस कोठडी देण्याची विनंती करताना सांगितले होते. अन्सारी व इतर तेरा जणांना मुंबईतील उपनगरी गाडय़ांमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेसंदर्भात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एटीएसने आरोपपत्रही दाखल केले आहे. मदनी याला दहशतवादी कारवायांसाठी नव्याने काही युवकांना भरती करीत असताना दिल्ली पोलिसांनी गुरूवारी अटक केली होती. नेपाळमार्गे तो या युवकांना पाकिस्तानात नेत असे. भारतातील मुंबईसह चार महानगरातून संगणक तज्ज्ञ असलेले तरूण तसेच किनारपट्टीच्या भागातील खलाशाचा अनुभव असलेले तरूण यांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी भरती करण्याचे काम मदनीकडे त्याच्या पाकिस्तानातील म्होरक्यांनी सोपवले होते.