Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

२६/११ : संवेदनक्षम स्थळांची चित्रफीत तयार करण्यासाठी मदानीने केली फईमला मदत..
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

दिल्ली पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद मदानी याने २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला करण्यासाठी विविध स्थळांच्या चित्रफितींची पूर्वतयारी करणाऱ्या फईम अन्सारी याला आर्थिक मदत केली होती, असे आता चौकशीत स्पष्ट झाले आहे. या शिवाय ११ जुलै २००६ मध्ये रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी कमल अन्सारी याची लष्कर-ए-तोयबामध्ये

 

भरतीही त्यानेच केली होती, असेही बाहेर आले आहे.
याबाबत दहशतवादविरोधी पथक तसेच गुन्हे अन्वेषण विभाग मदानी याची दिल्ली पोलिसांकडून कोठडी घेण्याची शक्यता आहे. फईमला २६/११ च्या हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याच्यावर खटला सुरू आहे. फईमने २००७ मध्ये मुंबईतल्या ताज, ओबेराय, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदींसह विविध स्थळांची चित्रफित तयार केली होती. ही चित्रफित लष्करच्या पाकिस्तानातील प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आली होती. या चित्रफितीमुळेच मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना हल्ल्याच्या ठिकाणांची संपूर्ण माहिती मिळाली होती. ही चित्रफीत तयार करण्याची जबाबदारी फईमवर सोपविण्यात आल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत पुरविण्यास मदानीला सांगण्यात आले होते. दिल्ली पोलिसांना याबाबत मदानीने कबुली दिली आहे. त्यामुळेच आम्ही मदानीला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
२००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटातील कमल अन्सारीला नेपाळमार्गे मदानीने लष्करच्या प्रशिक्षण केंद्रात पाठविले होते. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी आम्ही मदानीला ताब्यात घेऊ, असे दहशतवादविरोधी पथकाचे प्रभारी व अतिरिक्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी स्पष्ट केले. मदानी हा प्रामुख्याने उत्तर भारतातच लष्करच्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांचा शोध घेत असे. तो महाराष्ट्रात वा मुंबईत आला होता का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मदानी हा गेले काही वर्षे नेपाळमध्ये कार्यरत होता आणि तो सतत भारतात येत असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्याकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.