Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अनामत रकमेच्या व्याजातून म्हाडाला मिळाले २५ कोटी?
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

मुंबईतील तीन हजार ८६३ घरांसाठी आलेल्या चार लाख ३३ हजार अर्जाद्वारे अनामत रकमेपोटी म्हाडाकडे १३०० कोटी रुपये गोळा झाले. अयशस्वी अर्जदारांना अनामत रकम परत करण्यास सुरुवात झाली असली तरी ही अनामत रक्कम तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ वापरण्यास मिळाल्याने २० ते २५ कोटी रुपये निव्वळ व्याजापोटी म्हाडाच्या तिजोरीत गोळा होणार आहेत. ही

 

रक्कम अर्थातच कशीही खर्च करण्याचे अधिकार म्हाडाला आहेत.
बऱ्याच कालावधीनंतर म्हाडाने घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तब्बल सात लाख ५६ हजार अर्ज विकले गेले. या प्रत्येक अर्जापोटी १०० रुपये या दराने म्हाडाकडे सुमारे आठ कोटी रुपये जमा झाले. मात्र ही सर्व रक्कम खर्च झाल्याचा दावा म्हाडातील सूत्रांनी केला. फॉर्मची छपाई तसेच विक्री आणि अर्ज पुन्हा सादर करून घेणे, सोडतीसाठी अर्जांची वर्गवारी, यशस्वी उमेदवारांना पत्र देणे, त्यांची कागदपत्रे सादर करून घेणे आदी विविध सेवांसाठी एचडीएफसी बँकेला शुल्क अदा करण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. अनामत रकमेतून मिळालेल्या व्याजाची रक्कम मात्र म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहे. या रकमेचा सामान्यांसाठी घरे बांधण्यासाठी वापर केला जाणार आहे.