Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी
अल्पसंख्याकाचा विचार होणार?
मुंबई, ६ जून / खास प्रतिनिधी

विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून सत्ताधारी काँग्रेसमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नावाची चर्चा असली तरी लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नसल्याने

 

मुस्लिम नेत्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत काँग्रेसचे राज्याचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी व पक्षाध्यक्षांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी या पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. येत्या सोमवारी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तेव्हा उमेदवाराचे नाव निश्चित होईल. विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष ठाकरे हे मतदारसंघात अडकून पडू नये म्हणून त्यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांकाची मते काँग्रेसला मिळाली. मात्र या समाजाचा एकही खासदार निवडून आलेला नसल्याने या समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, असाही मतप्रवाह पुढे आला आहे. त्यासाठी हुसेन दलवाई, नतिकउद्दिन खतीब यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय कन्हैयालाल गिडवाणी, पुन्हा काँग्रेसवासी झालेले माजी प्रांताध्यक्ष रणजित देशमुख यांचेही प्रयत्न सुरू आहेत. अनेक इच्छुक गेले दोन दिवस नवी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तेथे नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.