Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

प्रादेशिक

काँग्रेस-राष्ट्रवादीला कळले आघाडीचे महत्त्व!
मुंबई, ६ जून / खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसबरोबर आघाडी करून लढण्याची तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले असतानाच आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा सूर आता बदलला आहे. आघाडी झाल्याशिवाय पुन्हा सत्ता मिळणार नाही, असा इशाराच पवारांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची विचार बळावत चालला आहे.

.. तरीही पोलिसांची सशस्त्र पथके आदेशाची वाट पाहत होती
मुंबई, ६ जून

उपायुक्त नांगरे-पाटील यांच्यासह सशस्त्र पोलिसांचा छोटा गट ताज महाल हॉटेलमध्ये शिरला तेव्हा चार अतिरेकी ५५१ क्रमांकाच्या खोलीत १२ मिनिटे तर ६३२ क्रमांकाच्या खोलीत तब्बल दोन तास होते. दोन्ही वेळा नांगरे-पाटील यांना कळविल्याचा दावा हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांकडून केला जात होता. १०.२७ वाजता जेव्हा अतिरेक्यांच्या हालचाली ताजच्या सुरक्षा रक्षकांनी टिपल्या तेव्हा त्याची माहिती नांगरे-पाटील यांना देण्यात आली.

शासनाच्या अनास्थेमुळे मौल्यवान खनिज संपत्तीचा साठा पडून!
प्रसाद रावकर, मुंबई, ३ जून

रेडी येथील तपासणी करण्यात आलेल्या नमुन्याच्या आधारे तेथे प्रतिटनामध्ये ६७ ग्रॅम सोने सापडू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील कोलार येथील सोन्याच्या खाणीतून प्रतिटन चार ग्रॅम सोने निघते. प्रतिटन चार ग्रॅम सोने काढण्यासाठी या खाणीत ६.५ कि. मी. खोल जावे लागत होते. आता ही खाण बंद करण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रण व्यवस्था आधुनिक करण्यात मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

मुंबईच्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेला जागतिक दर्जाचा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला असून या निर्णयांतर्गत मुंबईमध्ये परिसर वाहतूक यंत्रणा (एरिया ट्रॅफिक कंट्रोल) अत्याधुनिक करण्यात येणार आहे. मुंबईच्या रस्त्यावरील महागर्दीतून विनाअडथळा कोणत्याही सिग्नलवर न थांबता आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे कुणाला नाही आवडणार? ही बाब मुंबईत तरी अशक्यप्राय असे आपल्याला वाटेल पण आता काही दिवसातच यामध्ये बदल होऊन मुंबईकरांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

निर्मल स्वच्छतागृह बांधणीत २० कोटी मलिदा हडप?
दिलीप शिंदे, ठाणे, ६ जून

एमएमआरडीएने निर्मल एम.एम.आर.अभियानाअंतर्गत लाखमोलाची वस्ती स्वच्छतागृह बांधण्याचा सपाटा लावला असून ती कामे केवळ स्वयंसेवी संस्थांना देण्यात आलेली आहेत. असे असताना प्रत्यक्षात काम न करता प्रथा सामाजिक संस्थेने कार्यकर्ते कंत्राटदार नेमून ठाण्यातील १९८ स्वच्छतागृहांच्या मंजूर निधीपैकी सुमारे २० कोटी रुपयांचा मलिदा परस्पर हडप करण्याचा घाट घातला असल्याची ओरड पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

‘हल्ल्याची माहिती मुख्य सचिवांना विलंबाने मिळाली नाही’
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबतची पहिली बातमी रात्री ९.४० वाजता मुख्य सचिवांना कळल्यानंतर लगेच १० मिनिटांत म्हणजेच ९.५० वाजता ते मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तोपर्यंत त्यांचा संपर्क पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांच्याशी झाला होता. त्यामुळे त्यांना माहिती मिळण्यास विलंब झाला हे वस्तुस्थितीतीला धरून नसल्यााचा खुलासा मुख्य सचिवांचे सचिव सुधार ठाकरे यांनी केला आहे.

दिल्लीत पकडलेला दहशतवादी मदनीचे जाबजबाब एटीएस घेणार
मुंबई ६ जून/पीटीआय

राज्याचे दहशतवाद विरोधी पथक दिल्लीत अटक करण्यात आलेला महंमद ओमर मदनी याचे जाबजबाब घेण्याची शक्यता आहे, असे आज सूचित करण्यात आले. मदनी हा पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीझ सईद याचा साथीदार असून मुंबईत ११ जुलै २००६ रोजी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या संदर्भात त्याचे जाबजबाब घेतले जाणार आहेत.

पावसाळ्याला तोंड देण्यासाठी रिलायन्स एनर्जीचा कृती आराखडा
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

मुंबई उपनगरांना विजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स एनर्जीने येत्या पावसाळ्याला तोंड देण्याची तयारी पूर्ण केली असून पावसाळ्यात पाणी तुंबल्याने खंडित होणारा वीजपुरवठा, शॉक, आग लागणे यासारख्या घटनांमुळे होणाऱ्या विलंबाला व परिणामी गैरसोयींना तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. कृती आराखडय़ात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून एखाद्या भागांत पाणी तुंबल्याने तेथील इमारतीत असलेले विजेचे मीटर, रस्त्यांवरील मिनी-पिलर्स, किंवा उपकेंद्र यांना धोका पोहोचत असल्यास कंपनीला ग्राहकांच्या दृष्टिकोनातून तेथील वीजपुरवठा खंडित करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. या भागांतील पाणी ओसरले तरी सुरक्षेची खात्री केल्यानंतरच पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मध्यवर्ती त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन हाताळणारी पथके तयार करण्यात आली असून दळणवळणाची उपकरणेही सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. एकूण ३५ पथके तयार करण्यात आली असून ट्रान्स्फॉर्मर्स, स्विच गिअर्स यासारख्या महत्त्वपूर्ण उपकरणांचा वीजपुरवठा क्षेत्रात १० महत्त्वाच्या ठिकाणी साठा तयार ठेवण्यात आला आहे. आग, शॉक यासारख्या घटनांचे त्वरेन निराकरण होण्यासाठी १८००-२००-३०३० या हेल्पलाइनवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

युवक काँग्रेस उपाध्यक्ष हत्या; आरोपींना १० जूनपर्यंत पोलीस कोठडी
कल्याण, ६ जून/वार्ताहर

कल्याण पूर्व भागातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास गायकवाड यांच्या हस्ते प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून, १० जण फरार झाले आहेत. त्यांना येथील न्यायालयात उभे केले असता १० जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदिनाथ सातपुते यांनी सांगितले. योगेश धामापूरकर, शेखर धामापूरकर, अमित सोनावणे, मनोज कळशीकर या चार जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आज पोलिसांनी हेमंत परब, संजय कांबळे, दीपक मोरे, अजय कांबळे, विजय चिपळूणकर यांना अटक केल्याने अटक झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. त्यातील सहा जण फरार झाले आहेत. या हत्येप्रकरणी आणखी २० ते २५ जणांची नोंद असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांचे रीमांड अॅप्लीकेशनमध्ये नाव असल्याने त्याला अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) आदिनाथ सातपुते यांनी सांगितले.

महिलेची हत्या उघड
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

एका कॅटरिंग कंपनीत सुपरवायझर असलेल्या महिलेची हत्या उघड करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह चौघांना अटक केली आहे. २९ मे रोजी कल्याण शीळफाटा येथे एका ३० वर्षांंच्या महिलेचा भोसकलेला अर्धनग्न अवस्थेतीतल मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटत नव्हती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या धारावी येथील युनिटचे पोलीस नाईक विनायक सांगळे यांना मिळालेल्या माहितीवरून, सदर मृतदेह गोवंडीत राहणाऱ्या रुबीना ऊर्फ मेबीस कुरेशी हिचा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत ही हत्या तिचा पती अयूब रईस अहमद खान (२२) आणि त्याचे मित्र परवेझ मुन्नु खान ऊर्फ तबरेज (२२), सलमान खमुद्दीन खान (३३), कादर अली अबीद सय्यद (२२) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. चेंबूर येथील एका बारमध्ये काम करणाऱ्या रुबीनाशी अयूबचे सूत जमले. त्यांनी लग्न केले. त्यानंतर ती कॅटरिंग कंपनीत काम करू लागली. मात्र रुबीनाचे अन्य कुणाशी संबंध असल्याचा संशय अयूब घेत असे. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी तिने सोडचिठ्ठी दिली होती. सुरतमध्ये ती सबा यांच्या कॅटरिंग कंपनीत काम करीत होती. अयूबने तिला फोन करून मुंबईत पुन्हा बोलावून घेतले आणि मित्रांच्या मदतीने तिची हत्या केली. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विनायक सावदे अधिक तपास करीत आहेत.

कांदिवलीतील नाल्यावरील भिंत पाडण्याची मनसेची मागणी
मुंबई, ६ जून / प्रतिनिधी

कांदिवली (प.) येथील साईनगर, तुळस्करवाडी, नरवणे विद्यालय येथील नाल्याजवळ बांधलेली भिंत तोडण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा व अस्थापन विभागाचे सरचिटणीस राजेश देसाई यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. अलीकडेच प्रदीप कावणकर हा सहा वर्षांचा मुलगा खेळता खेळता या भिंतीलगत खणलेल्या खड्डय़ात पडून मरण पावल्याची माहिती या पत्रकात दिली आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांच्या भावनेचा उद्रेक झाला व तेथील रहिवासी रस्त्यावर उतरले होते. या भिंतीमुळे तेथे जवळपास असलेल्या चौदाशे झोपडय़ांमध्ये छतापर्यंत पाणी भरण्याचा धोका देसाई यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे ही भिंत बांधत असताना तुळस्करवाडी ते नरवणे विद्यालय यामधील नाल्यावरील पुल तोडण्यात आला होता. त्याची पुनर्बाधणी करावी आणि या नाल्यावर बांधण्यात आलेला स्लॅब तोडण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.