Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

वादळाचा श्रीगोंद्याला जोरदार तडाखा
श्रीगोंदे, ६ जून/वार्ताहर

कुकडी साखर कारखान्याला आज संध्याकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. वादळाने कारखान्याच्या मुख्य इमारतीवरील पत्रे उडाल्याने छताची चाळण झाली, तर बाहेर ताडपत्रीखाली ठेवलेली साखर भिजल्याने मोठे नुकसान झाले. शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये अनेक घरांवरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळल्याने बहुतेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोठी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूकही विस्कळित झाली.

‘जशास तसे उत्तर देऊ’
अध्यक्षांचे कुरघोडीचे राजकारण - झावरे
नगर, ६ जून/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत अध्यक्षांकडून पक्षीय व कुरघोडीचे राजकारण केले जात असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेस निधी उपलब्ध करून दिला, तरी त्यांच्यावर टीका करून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे. पालकमंत्र्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

यश
नुकताच बारावीचा रिझल्ट लागला
पुण्याहून रोहनचा फोन आला
‘काका.. पास झालो
ब्याऐंशी टक्के मिळाले’
मोठय़ा आनंदाने रोहन
सांगत होता
मी विचारले, ‘आता पुढे काय?’

अ‍ॅम्पियरची कहाणी
आता आंद्रे-मेरी अ‍ॅम्पियर (१७७५-१८३६) हा फ्रेंच माणूस वीज आणि चुंबकत्व यांच्यासंबंधीची पुढची झेप घेणार होता. अनेक संशोधकांप्रमाणेच अ‍ॅम्पियरने लावलेला शोध हा अतिशय प्रयत्नपूर्वक एकाच विषयावर सगळे लक्ष केंद्रित करून वगैरे लावलेला शोध नसून आपल्या आयुष्यातल्या एकूणच सगळय़ा गोष्टींकडे कुतूहलाने बघता बघता केलेल्या उद्योगांमध्ये अचानक सापडलेल्या गोष्टीसारखा होता. अ‍ॅम्पियर हा अतिशय धार्मिक आणि कर्मठ वातावरणात वाढला. त्याची सतत त्याच्यावर लादले जाणारे विचार आणि त्याची स्वत:ची तार्किक बुद्धी यामध्ये कुतरओढ व्हायची. त्याच्या वडिलांचा रेशमी कापडाचा व्यवसाय होता.

श्रीरामपूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी गुलाटी, बोरावके सचिव
श्रीरामपूर ६ जून/प्रतिनिधी
लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण गुलाटी यांची, सचिवपदी आशिष बोरावके व खजिनदारपदी पुरुषोत्तम झंवर यांची निवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुनील गुप्ता, सचिव जगदीश नारा व खजिनदार ए. एल. खैरे यांनी दिली. उपाध्यक्षपदी गिरीश चंदन, द्वितीय उपाध्यक्ष शम्मीकुमार गुलाटी, तृतीय उपाध्यक्ष डॉ. अजित देशपांडे, सहसचिव डॉ. मनोज संचेती, सहखजिनदार अशोक भागवानी, टेलट्विस्टर वैभव लोढा, टेमर विजय सेवक, सदस्यवृध्दी समिती डॉ. राजेंद्र ढोले, वार्ताहर संपादक संजय डंबीर, अॅक्टिव्हीटी चेअरमन शम्मीकुमार गुलाटी, जनसंपर्क अधिकारी रमेश भालेराव व संचालक भरत ओझा, प्रताप बोरावके, अजित अरबट्टी, डॉ के. डी. मुंदडा, बाळासाहेब खटोड, सुरेंद्रसिंग भटियानी, सुनील पंडित, विनोद रोहेरा, संजय साठे, डॉ.रवंींद्र कुटे, विलास बोरावके, सुनील गुप्ता यांची करण्यात आली.

‘इंडिया महिला सहकारी पतसंस्थेस दीड लाखाचा नफा’
वाडेगव्हाण, ६ जून/वार्ताहर
इंडिया महिला सहकारी पतसंस्थेला यावर्षी १ लाख ४७ हजार ८३५ रुपयांचा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षा बालिका शेळके यांनी दिली. येथे २४ जून १९९४ रोजी या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीची वाटचाल सुरू आहे. संस्थेने आजपर्यंत ५ शाखा स्थापन केल्या. त्यामध्ये नगर, भोसरी, शिरूर, ढवळगाव, वाडेगव्हाण येथे पतसंस्थेच्या शाखा आहेत. पतसंस्थेचे व्यवस्थापक बी. डी. जाधव म्हणाले की, संस्थेचे भागभांडवल १७ लाख २९ हजार ९८० रुपये असून, संस्थेकडे ४ कोटी ४३ लाख २२ हजार ८५० रुपयांच्या ठेवी आहेत. ४ कोटी २४ लाख ३३ हजार १८८ रुपयांचे कर्जवाटप संस्थेने केले आहे. संस्थेचे ६ हजार ६७१ सभासद आहेत. संस्थेच्या स्वतच्या मालकीची इमारत वाडेगव्हाण, ढवळगाव येथे आहे.

महिला सबलीकरण संघटना स्थापण्याचा विचार
राहाता, ६ जून/वार्ताहर

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात महिला सबलीकरण संघटना स्थापना करण्याबाबत विशेष कार्यक्रमात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात प्रा. सुषमा अंधारे यांनी मार्गदर्शन केले.अंधारे यांनी महिला सबलीकरणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. जागतिकीकरण आणि भारतीय महिला, महिलांचे समाजातील स्थान, कायदेविषयक माहिती आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग या विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील महिला कर्मचारी, विद्यार्थिनी आणि प्रवरा परिसरातील महिला मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. एस. आर. पट्टन यांनी केले. आभार प्रा. हेमलता भवर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. आरती दैठणकर व प्रा. संजय भवर यांनी केले.

लहुजी सेनेचा मंगळवारी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा
श्रीरामपूर, ६ जून/प्रतिनिधी

राष्ट्रीय लहुजी सेनेच्या वतीने येत्या मंगळवारी (दि. ९) दुपारी १ वाजता मुंबईत मंत्रालयावर मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिनकर घुले यांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व सेना नायक जी. एस. कांबळे करणार आहेत. मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे, मागासवर्गीयांचे कर्ज माफ करावे, भांबोरा (ता. कर्जत) येथील मातंग समाजावर हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करावी, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, अण्णाभाऊ साठे महामंडळाला पाचशे क ोटी मिळावेत आदी मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप कनगरे, संजय बलसाने, संदीप आढागळे, रावसाहेब अवचिते, गोरक्षनाथ शेलार यांनी केले आहे.

मुद्रांक विक्री बंद करण्याचा इशारा
कोपरगाव, ६ जून/वार्ताहर
राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या मुद्रांक विक्री मनौतीचे १ टक्के केलेली कपात त्वरित रद्द करावी, अशी मागणी शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक संघटनेचे कोपरगाव शाखेचे अध्यक्ष दिलीप कानडे यांनी केली आहे.कानडे म्हणाले की, सन १९९९पूर्वी मुद्रांकविक्रीची मर्यादा २ हजार होती. त्यानंतर ती मर्यादा वाढवून १० हजार रुपये केली. या मुद्रांक विक्रीतून विक्रेत्यास ३ टक्के रक्कम मिळत होती. आता विविध बँका, पोस्ट खातेतर्फे ई स्टँम्पिंग व फ्रँकिंग पद्धतीने सरकारने मुद्रांक विक्री सुरू केली. मुद्रांक विक्रीची मर्यादा वाढवून ५० हजार रुपये करावी; अन्यथा येत्या १७ जूनपासून बेमुदत मुद्रांक विक्री बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अहल्यादेवी होळकर जयंतीचा आज कर्जतला कार्यक्रम
कर्जत, ६ जून/वार्ताहर
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम उद्या (रविवारी) होत आहे. कार्यक्रमास राजयोगिनी अहल्याबाई महानाटय़ातील कलाकार अर्चना चितळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे नानापाटील देवकाते, अण्णासाहेब पाटील, सोलापूरचे नेते नारायण पाटील, सोलापूरच्या महापौर अरुणाताई वाकसे, दादाभाऊ चितळकर, राजयोगिनी नाटकाचे दिग्दर्शक किरण शनी, शाळिग्राम होडगर, रामभाऊ माने, घनश्याम हाके, आनंद थोरात उपस्थित राहणार आहेत.अहल्यादेवींच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर येथील मराठी शाळेमध्ये जयंतीचा कार्यक्रम होईल. प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ अण्णासाहेब पाटील आहेत.

खर्डा ग्रामस्थांच्या सतर्कतेने दरोडय़ाचा प्रयत्न फसला
खर्डा, ६ जून/वार्ताहर

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आज मध्यरात्री येथे दरोडा टाकण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला.आज मध्यरात्री अडीच वाजता एक जीप गावातील कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी थांबली. त्या जीपमधून १० ते १२ तरुण अंगात काळे बनियन व चेहरे झाकून शुक्रवार पेठेत गेले. त्यांना काही लोकांनी पाहिले. त्यांनी त्वरित गावकऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. नंतर पोलीस दूरक्षेत्रालाही कळविण्यात आले. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी उत्तम सोनवणे व पवार यांच्यासह तिघेजण त्वरित शुक्रवार पेठेत दाखल झाले. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत शुक्रवार पेठेतील प्रकाश सोनटक्के, सावता लोखंडे, भोला सोनटक्के, दत्ता योगे, कृष्णा थोरात, अमोल थोरात, परवीण कुंभार आदी तरुणांनी गस्त घातली. जामखेडला घरफोडी झालेली असताना खडर्य़ातही चोरटे शिरल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. खडर्य़ात पोलिसांनी गस्त सुरू करावी व पुरेसे पोलीस बळ मिळावे, अशी मागणी होत आहे.

तालुका प्रशिक्षणात ३०० शिक्षक सहभागी
नेवासे, ६ जून/वार्ताहर

राज्य सरकारच्या सुधारित व पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबतचे तालुकास्तरीय प्रशिक्षण ४ जूनपासून गटशिक्षणाधिकारी राम हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे यांनी दिली. प्रशिक्षणात सुमारे ३०० प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षक सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने यावर्षी पहिली, चौथी, आठवीच्या पाठय़पुस्तकांची पुनर्रचना केली. त्यानुसार या अभ्यासक्रमाचा परिचय पाठय़क्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना व्हावा, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील जि. प. प्राथमिक, खासगी अनुदानित आश्रमशाळा, खासगी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांपैकी पहिलीचे १००, चौथीचे १०० व आठवीचे १०० असे एकूण ३०० शिक्षक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणादरम्यान प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी सहभागी असणार आहेत. प्रशिक्षणासाठी एकूण ५० तज्ज्ञ आहेत.

इंडिकाची धडक बसून मोटरसायकलस्वार ठार
शेवगाव, ६ जून/वार्ताहर
इंडिका गाडीचे टायर फुटल्यामुळे पुढे चाललेल्या मोटरसायकलला मागून धडक बसल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारार्थ नगर येथे हलविण्यात आले. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजता शेवगाव-नगर रस्त्यावर फलकेवाडी फाटय़ाजवळ झाला.हिरो होंडा मोटरसायकल (एमएच १६ एक्स २३५९) वरून पाथर्डी येथील रहिवासी मुबारक दगडू शेख व शंकर रामराव बोरुडे शेवगावच्या दिशेने येत होते. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या इंडिका गाडीचे (एमएच १६ आर २६९१) टायर फुटल्यामुळे ही गाडी मोटरसायकलवर आदळली. यात मुबारक दगडू शेख वय ४०, शिक्षक कॉलनी, पाथर्डी) हे जागीच ठार झाले,

शेवगावला पावसाची हजेरी
शेवगाव, ६ जून/वार्ताहर

शहर व परिसरात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.या पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला. पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पाऊस असाच वेळेवर आला, तर खरिपाच्या दृष्टीने तो उपयुक्त ठरणार आहे. मागील वर्षी झालेली बी-बियाणे व रासायनिक खतांची टंचाई लक्षात घेता बहुतेक शेतकऱ्यांनी बियाणे व खते अगोदरच खरेदी करून ठेवली आहेत. एकंदरीत आजच्या पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

विविध मागण्यांसाठी उद्या युतीचा रास्ता रोको
पाथर्डी, ६ जून/वार्ताहर

योग्य दरात व पुरेशा प्रमाणात खते, बी-बियाणे मिळावीत, मागणी करताच टँकर मिळावे आदी मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ८) करंजी येथे युतीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रामनाथ बंग यांनी दिली. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, त्यात सुधारणा करावी, तालुक्यातील सर्व गावांमध्ये सिंगल फेज योजना राबवावी. या मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात येणार आहेत. आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे करणार आहेत.

‘औषधविक्री व्यवसाय नव्हे समाजसेवा’
पाथर्डी, ६ जून/वार्ताहर

औषधविक्रीचा नुसता व्यवसाय नसून तो एक समाजसेवा असल्याचे मत अन्न व प्रशासन नाशिक विभागाचे आयुक्त प्रभाकर रावखंडे यांनी व्यक्त केले.तालुक्यातील सर्व औषधविक्रेत्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरचे सहायक आयुक्त गिरीब वखारिया होते. यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास जरांगे, अनिल बोरुडे, प्रमोद दहिफळे, गणेश बाहेती, चंदन कुचेरिया, अविनाश पालवे, अरुण आंधळे, सुनील शिंगवी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत जाजू यांनी केले. आभार अशोक गांधी यांनी मानले.

श्रीसाई स्नेहबंधतर्फे १४ पासून साईसच्चरित ग्रंथ पारायण
राहाता, ६ जून/वार्ताहर

श्रीसाई स्नेहबंध ग्रुपच्या वतीने शहरातील वीरभद्र मंदिरासमोर १४ ते २१ जून या कालावधीमध्ये श्रीसाईसच्चरित ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष गोकुळचंद पारख यांनी दिली. पारायण सोहळ्याचे सलग आठवे वर्ष आहे. पारायण सोहळ्यास बसणाऱ्या भाविकांना ग्रंथ दिला जाणार आहे. दि. २१ जून रोजी नेवासे येथील संत तुकाराममहाराज संस्थानचे अध्यक्ष उद्धवमहाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.पारायणास बसणाऱ्या भक्तांनी आपली नावे पंढरीनाथ खिस्ते, रामकृष्ण न्यूज पेपर एजन्सी बन्सीकाका सोळंकी (२४२७१९) यांच्याकडे नोंदवावीत.

सुभाष साठे यांचे निधन
श्रीरामपूर, ६ जून/प्रतिनिधी

करजगाव येथील सुभाष भानुदास साठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्याच्यामागे आई, पत्नी, मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. फत्याबाद येथील पत्रकार रावसाहेब साठे यांचे ते बंधू होत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडसाने यांनी सूत्रे स्वीकारली
श्रीरामपूर ६ जून/प्रतिनिधी

अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी सुनील कडसाने यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी आज पदाची सूत्रे हाती घेतली. कडसाने याआधी खामगाव, बुलढाणा, मलकापूर, मनमाड येथे पोलीस उपअधीक्षक होते. नाशिकला पोलीस अ‍ॅकॅडमीत त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले. गुन्हेगारीचा बिमोड केल्याने त्यांना विशेष पदकाने सन्मानित केले.कडसाने यांनी आज अधीक्षक अशोक डोंगरे यांची भेट घेतली.