Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

एका मृतप्राय प्रकल्पाला नवसंजीवनी!
जयेश सामंत

ठाणे-नेरुळ-उरण या गेल्या एक तपाहून अधिक काळ रखडलेल्या अतिशय महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला पुन्हा एकदा संजीवनी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. न्हावा तसेच द्रोणागिरी पट्टय़ात भविष्यकाळात आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच विशेष आर्थिक क्षेत्रासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दोन मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीत मोठा अडथळा ठरत असलेल्या खारफुटी तसेच सीआरझेडसारखे कडक कायदे या मोठय़ा प्रकल्पाच्या उभारणीसाठी काहीसे शिथील करण्याचा निर्णयही नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे. आता नवी मुंबईपाठोपाठ रायगड जिल्ह्णााच्या विकासाचे जे आडाखे मागील काही वर्षांपासून बांधले जात आहेत, त्यास मूर्त रूप मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे जागतिक दर्जाचे विमानतळ दृष्टिपथास येत असताना आता नेरुळ-उरणसारखा गेली कित्येक वर्षे रखडलेला प्रकल्पही जोमाने सुरू करण्याचा बेत सिडको तसेच रेल्वेकडून आखला जात आहे.

बेरजेचे राजकारण
अनिरुद्ध भातखंडे

राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमस्वरूपी मित्र वा शत्रू नसतो, असे म्हणतात. पनवेलमधील राजकीय निरीक्षकांना नुकताच या उक्तीचा प्रत्यय आला. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे नुकत्याच पार पडलेल्या राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेने क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली. खांदा कॉलनीत झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने राजकारणातील अनेक नामदारांची पनवेलला पायधूळ लागली. यामध्ये राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री रवी पाटील यांचाही समावेश होता. पारितोषिक वितरण समारंभासाठी ते प्रमुख पाहुणे या नात्याने येणार हे कार्यक्रमपत्रिकेवरूनच स्पष्ट झाले होते, परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमात त्यांना देण्यात आलेल्या व्हीआयपी वागणुकीमुळे रायगड काँग्रेसमधील जुनी समीकरणे बदलून नवी समीकरणे जुळत असल्याचे स्पष्ट झाले. मैदानात खेळाडू एकमेकांचे पाय खेचत असताना व्यासपीठावरील (पूर्वाश्रमीचे प्रतिस्पर्धी) नेते परस्परांचे हात बळकट करीत होते.

पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवरून अतिरेक्यांच्या घुसखोरीची शक्यता
मधुकर ठाकूर

कोकण किनारपट्टीवरील सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्थेकडून जाणवणारी ढिलाई आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, गस्ती नौकांचा अभाव यामुळे ७२० कि. मी. लांबीचा किनारा अद्याप तरी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाच्या सुरक्षिततेला सागरी मार्गाने येणाऱ्या अतिरेकी व दहशतवाद्यांपासूनच अधिक धोका असल्याचे इशारे वारंवार गुप्तचर संस्थांकडून दिले गेले आहेत. त्यानंतरही सागरी सुरक्षा यंत्रणेत फारशी सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. उलट पावसाळी हंगाम सुरू होताच सध्या कार्यरत असलेल्या गस्ती नौकांची गस्तीही ठप्प होणार असल्याने या काळातच अतिरेक्यांची घुसखोरी होण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
२६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागरी सुरक्षा यंत्रणा कशी कुचकामी आहे,