Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य

‘पुलोत्सवा’मध्ये यंदा नीना कुलकर्णी आणि प्रभाकर पणशीकर
रत्नागिरी, ६ जून/खास प्रतिनिधी

रत्नागिरी शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लक्षवेधी उपक्रम ठरलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये यंदा ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी, बुजुर्ग अभिनेते प्रभाकर पणशीकर आणि प्रतिभावंत संगीतकार अशोक पत्की यांना भेटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. मराठी साहित्य व कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग बहुरूपी व्यक्तिमत्व कै. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृती जागवणारा ‘पुलोत्सव’ हा कार्यक्रम पुण्याच्या ‘आशम सांस्कृतिक’ या संस्थेतर्फे गेली आठ वर्षे पुण्यासह राज्याच्या काही प्रमुख शहरांमध्ये आयोजित केला जातो. त्यामध्ये गेल्या वर्षांपासून रत्नागिरीचा समावेश झाला आहे.

कृषी अधिकारी कार्यालयावर ‘मनसे’ कार्यकर्त्यांचा हल्ला
कारंजा-लाड, ६ जून / वार्ताहर

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या परमिट वाटपास होणारा विलंब आणि कृषी अधिकारी न भेटल्यामुळे संतप्त झालेल्या ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी येथील कृषी अधिकारी कार्यालयात धुडगूस घालून घातला. कार्यकर्त्यांनी साहित्याची मोडतोड करून दस्तावेज कार्यालयाबाहेर भिरकावले. शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.

वरूड तालुक्यास वादळाचा फटका दोन ठार, पाच जखमी
वरूड, ६ जून / वार्ताहर

तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वादळाचा जबर फटका बसला. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. यात वीज पडून एकजण ठार तर एक महिला घर पडल्याने खाली दबून मृत्युमुखी पडली. ५ जण जखमी झाले मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख तर जखमींनाही आर्थिक मदत दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी सांगितले.

वसंतराव नाईक महामंडळाचे १७२ कोटीचे कर्ज माफ - लक्ष्मण माने
सातारा, ६ जून/प्रतिनिधी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे १७२ कोटी ४५ लाख ७६ हजारांचे कर्ज राज्य शासनाने माफ केले असून, त्याचा राज्यातील ६१ हजार ४६४ लाभाथ्र्यीना फायदा झाला असल्याची माहिती या महामंडळाचे व भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा आज कर्मभूमी कराडमध्ये भव्य सत्कार
कराड, ६ जून / वार्ताहर

केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र पदभाराची बढती मिळालेले काँग्रेसचे महासचिव व कराडचे सुपुत्र पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण उर्फ पृथ्वीराजबाबा यांचा उद्या रविवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजता लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती मलकापूरचे उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे युवानेते मनोहर िशदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा त्यांची कर्मभूमी कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , पणनमंत्री मदन पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी काँग्रेसप्रेमी जनतेने आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केले आहे.

मौलवींच्या मध्यस्तांची हत्या
इस्लामाबाद, ६ जून/वृत्तसंस्था

वायव्य सरहद्द प्रांतात तालिबानी दहशतवादी आणि पाकिस्तान सरकार यांच्यात शस्त्रसंधी आणि शांततापूर्ण वाटाघाटी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मौलवींच्या दोन निकटवर्ती मध्यस्तांची हत्या करण्यात आली. वायव्य भागातील कैदांना मलकंद ते पेशावरमध्ये घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात हे दोन मध्यस्त ठार झाल्याचे लष्कराने सांगितले.
अमीर इझात आणि मोहंमद आलम अशी या मध्यस्तांची नावे आहेत. मौलवी सुफी मोहंमद याचे निकटवर्ती व सहायक होते, अशी माहिती लष्कराने दिली. गुरुवारी या दोघांना वायव्य सरहद्द प्रांतात तीन अफगाणी नागरिकांसोबत गुरुवारी पकडण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात स्वात खोऱ्यातील शरियाच्या अंमलबजावणीच्या मोबदल्यात तालिबानी आणि पाकिस्तानमध्ये शांतता वाटाघाटी करण्यात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यातील अमीर इझात हे मौलवींचे प्रवक्ते होते, असे लष्कराकडून सांगण्यात आले.

भोगावती नदीत पाच महिला बुडाल्या, एकीचा मृत्यू
पेण, ६ जून/वार्ताहर

बोरगाव येथील भोगावती नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवती अचानक बुडाल्या. पेण येथील एका युवकाने प्रसंगावधान ठेवून त्यापैकी चार जणांचे प्राण वाचविले, तर बुद्धनगर येथील पुजा अरुण भोजने ही युवती नदीत बुडून मरण पावली. यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, बुद्धनगर परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुजा अरुण भोजने (१८, रा. बुद्धनगर, पेण), लीना सुर्वे, नूतन सुर्वे, श्रुती महाडिक आणि आरती चंदने या पोहण्यासाठी बोरगाव येथील भोगावती नदीत गुरुवारी सकाळी गेल्या असताना सातच्या सुमारास अचानक त्या बुडू लागल्या. त्यावेळी बोरगाव रस्त्यावरून मॉर्निग वॉकला जात असलेल्या जयेश भोईर (रा. कळंब डोंगरी, पेण) यांनी प्रसंगावधान राखून नदीत उडी घेऊन चौघांना वाचविण्यात यश मिळवले, तर पुजाला नदीच्या खोल पात्रातून काढण्यात आले. नागरिकांच्या मदतीने पाचही मुलींना टेम्पोतून पेण येथील शासकीय रुग्णालयात आणले, परंतु पुजा भोजने हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुजा भोजने ही १२वीची विद्यार्थिनी होती.

मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीत पाऊस!
रत्नागिरी, ६ जून/खास प्रतिनिधी

गेला आठवडाभर अभूतपूर्व पाणी टंचाई आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना आज मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पडलेल्या जोरदार पावसाने दिलासा दिला. दुपारी अडीचच्या सुमारास पावसाची पहिली सर आली. त्यानंतर साडेतीनपासून संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. वादळीवाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. हवेत कमालीचा गारवा आला. यंदा शहरात गेले काही दिवस अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. एक-दोन दिवस पाऊस पडला नाही, तर आणखी पाणी कपात करावी लागणार होती. पावसाच्या आगमनामुळे मात्र तो प्रश्न निकाली निघाला आहे.

नाशिकजवळ अपघातात तीन ठार
नाशिक, ६ जून / प्रतिनिधी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाडिवऱ्डे शिवारात आज सकाळी आयशर टेम्पो व मालमोटार यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. मृत व जखमींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. टेम्पो नाशिकहून मुंबईला निघाला होता. सकाळी सहाच्या सुमारास तो महामार्गावरील राजूर फाटय़ाजवळ आला असताना समोरून भरधाव आलेल्या मालमोटारीशी त्याची धडक झाली. त्यात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये टेम्पोतील एक तर मालमोटारीतील दोन जणांचा समावेश आहे. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

‘ईटीएच’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे अतुल व्होरा यांनी स्वीकारली
पुणे, ६ जून / प्रतिनिधी

अतुल व्होरा यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या ईटीएच लिमिटेड या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. व्होरा यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापनपदावर काम केले असून, ग्राहक संबंधित व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा मानला जातो. विपणन (मार्केटिंग), धोरण (स्ट्रॅटेजी), साखळीपद्धतीचे व्यवस्थापन (चॅनेल मॅनेजमेंट), शैक्षणिक व्यवस्थापन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. ईटीएच येथे रुजू होण्यापूर्वी त्यांनी एचईआय या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तसेच माया एंटरटेन्मेंट लि. या संस्थेचे ग्लोबल एज्युकेशन विभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ऑटोडेस्क या कंपनीच्या आशिया खंडाचे व्यवस्थापक तसेच अ‍ॅप्टेक या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी सुमारे दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी काम केले आहे. व्होरा यांनी १९८८ साली पुण्यातील एमआयटी या संस्थेतून संगणक अभियंता ही पदवी प्राप्त केली. त्यांना २००२ साली नेतृत्वातील उत्तमता (एक्सलन्स इन लीडरशीप) तसेच उत्तम व्यवस्थापक (बेस्ट मॅनेजर) म्हणून सलग तीन वेळा पुरस्कार मिळाले आहेत. ईटीएचचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर यांनी व्होरा यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य देवराज गुप्ता यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन
सोलापूर, ६ जून/प्रतिनिधी

दयानंद शिक्षण संस्थेचे माजी स्थानिक सचिव, प्राचार्य देवराज गुप्ता यांचे शनिवारी सकाळी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने दयानंद शिक्षण संस्थेच्या परिवारात शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात उद्या रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्राचार्य गुप्ता हे सोलापुरात दयानंद शिक्षण संस्थेच्या स्थानिक सचिवपदी १९७७ मध्ये नियुक्त झाले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेचा कायापालट केला होता. चार वरिष्ठ, दोन कनिष्ठ महाविद्यालये व दोन प्रशाला यांचे प्रशासन त्यांनी तब्बल ३१ वर्षे यशस्वीरीत्या चालविले होते. त्यांनी नवनव्या अभ्यासक्रमांची व उपक्रमांची भर घातली होती. उत्कृष्ट प्रशासकाबरोबरच उत्तम वक्ते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे दयानंद संस्थेच्या वतीने उद्या रविवारी ७ जून रोजी दुपारी १२.१५ वाजता पुण्यात सदाशिव पेठेतील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.