Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘पुलोत्सवा’मध्ये यंदा नीना कुलकर्णी आणि प्रभाकर पणशीकर
रत्नागिरी, ६ जून/खास प्रतिनिधी

रत्नागिरी शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लक्षवेधी उपक्रम ठरलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये यंदा ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी, बुजुर्ग अभिनेते प्रभाकर पणशीकर आणि प्रतिभावंत संगीतकार अशोक पत्की यांना भेटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
मराठी साहित्य व कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग बहुरूपी व्यक्तिमत्व कै. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृती जागवणारा ‘पुलोत्सव’ हा कार्यक्रम पुण्याच्या ‘आशम सांस्कृतिक’ या संस्थेतर्फे गेली आठ वर्षे पुण्यासह राज्याच्या काही प्रमुख शहरांमध्ये आयोजित केला जातो. त्यामध्ये गेल्या वर्षांपासून रत्नागिरीचा समावेश झाला आहे. काही व्यावहारिक अडचणींमुळे यंदाच्या वर्षी पुणे वगळता अन्यत्र ‘पुलोत्सव’ होऊ शकला नाही, पण रत्नागिरीच्या ‘आर्ट सर्कल’ने पुलंशी या शहराचे असलेले भावनिक ऋणानुबंध लक्षात घेऊन यंदाही हा महोत्सव ‘आशम सांस्कृतिक’ च्या सहकार्याने आयोजित केला आहे.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहामध्ये पु. लं.च्या पुण्यतिथीच्या दिवशी, येत्या १२ जून रोजी या महोत्सवाचा प्रारंभ होणार असून, १४ जून रोजी रात्री सांगता होणार आहे. मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या हस्ते १२ जूनला संध्याकाळी साडेसहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर ‘पुल वृत्तान्त’ हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाटय़निर्माते आणि बुजुर्ग अभिनेते प्रभाकर पणशीकर यांना यंदाचा ‘पुलोत्सव सन्मान पुरस्कार’ परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांच्या हस्ते देण्यात येणार असून, त्यानंतर प्रसिद्ध गायक-नट चंद्रकांत काळे त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणार आहेत. त्या पाठोपाठ अभिनेत्री कुलकर्णी यांच्याशी सुप्रिया चिलाव संवाद साधणार आहेत. या दोन्ही मातब्बर कलाकारांच्या अभिनय कौशल्याचीही झलक यावेळी काही ध्वनिचित्र फितींद्वारे दाखवण्यात येणार आहे.
महोत्सनाच्या दुसऱ्या दिवशी, १३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘बोक्या सातबंडे’ हा सध्या गाजत असलेला चित्रपट दाखवला जाणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी ‘पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा’चे वितरण प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते केले जाणार आहे, तर गेल्या सुमारे शंभर वर्षांतील मराठी कवितेच्या वाटचालीचा वेध घेणारा ‘कविता मनोमनी’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम रात्री सव्वाआठ वाजता सादर होणार आहे. प्रसिद्ध गायक-नट चंद्रकांत काळे, ‘सौमित्र’ किशोर कदम आणि रत्नागिरीची ‘लिटल चॅम्प’ शमिका भिडे त्यामध्ये सहभागी होणार आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १४ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘ख्याल’, ‘विश्वनाथ-एक शिंपी’, ‘चैत्र’ आणि ‘शाळा’ हे लघुपट दाखवले जाणार आहेत. याच दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रतिभाशाली संगीतकार अशोक पत्की यांना ‘पुलोत्सव जीवन-गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर स्वत: पत्कीच्या संगीतरचनांवर आधारित संगीत रचनांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या संपूर्ण महोत्सवासाठी २०० रुपये, १५० रुपये व १०० रुपयांच्या प्रवेशिका असून, येत्या रविवारपासून (७ जून) त्या नाटय़गृहावर उपलब्ध होतील, असे ‘आर्ट सर्कल’चे कार्याध्यक्ष नितीन कानविंदे यांनी नमूद केले.