Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कृषी अधिकारी कार्यालयावर ‘मनसे’ कार्यकर्त्यांचा हल्ला
कारंजा-लाड, ६ जून / वार्ताहर

तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या बियाण्यांच्या परमिट वाटपास होणारा विलंब आणि कृषी अधिकारी न भेटल्यामुळे संतप्त झालेल्या ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी येथील कृषी अधिकारी कार्यालयात धुडगूस घालून घातला. कार्यकर्त्यांनी साहित्याची मोडतोड करून दस्तावेज कार्यालयाबाहेर भिरकावले. शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.
मनसेचे २५ ते ३० कार्यकर्ते कृषी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले. परंतु, कार्यालयातील सर्व अधिकारी मालेगाव येथे गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीवरून कृषी अधिकारी अशोक कांडरकर यांच्याशी संपर्क साधला परंतु, सध्या मालेगावात असल्याने लगेच तेथे येण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार कार्यालयात येऊन अधिकारी भेटत नाहीत व परमिटला विलंब लागतो, अशी कारणे देत संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कार्यालयातील सामानाची मोडतोड केली. पंखे वाकवले, खिडकीच्या काचा फोडल्या, दस्तावेज कार्यालयाबाहेर मैदानात फेकून दिले. कार्यालयातील कपाट व खुच्र्याही बाहेर भिरकावल्या. एक खुर्ची तर मैदानातील दहा फूट उंचीच्या बाभळीच्या झाडावर लटकलेली होती. जमीन मापन करण्याचे ‘डंपी लेव्हल’ हे उपकरणही बाहेर फुटलेले पडून होते.
कार्यालयात असलेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता हे सर्व कार्यकर्ते पळून गेले. हल्लाबोल करताना ते मनसेचा व राज ठाकरे यांचा जयघोष करीत असल्याची माहिती तेथे उपस्थित असणाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
कृषी कार्यालयामार्फत पॅकेज अंतर्गत सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचे बियाणे परमिटवर वाटण्यात येते. कारंजा तालुक्यात ३ हजार ४४५ लाभार्थी शेतकरी आहेत. सोयाबीनची ३० किलोची एक बॅग प्रत्येक लाभार्थीला दिली जाते. कारंजा तालुक्यासाठी ४० हजार क्िंवटल सोयाबीनचे बियाणे मंजूर करण्यात आले. सोयाबीन प्रमाणेच तूर, मूंग व उडीद यांचे बियाणेही उपलब्धतेनुसार वाटले जाते. संबंधित कृषी सहाय्यक अधिकारी लाभार्थीच्या गावी जाऊन परमिटचे वाटप करतात, अशी माहिती कारंजा कृषी अधिकारी तायडे यांनी दिली.
या परमिटनुसार मंजूर बियाणेही खरेदी विक्री संस्थेच्या सहा केंद्रांमार्फत व विविध कार्यकारी सोसायटीमार्फत वितरित केले जाते. परमिट मंजूर करून ते शेतकऱ्यांना देणे एवढेच काम कृषी अधिकारी कार्यालयाचे आहे. मात्र, परमिट मिळण्यास होणारा विलंब, अधिकारी न भेटणे अशा तक्रारी अनेक जण करीत असतात. मात्र, अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मोडतोडीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मोडतोड प्रकरणी कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक अधीक्षक एम.एम. इंगोले यांनी कारंजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कारंजा पोलिसांनी मनसेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे वृत्त लिहीपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते.