Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

वरूड तालुक्यास वादळाचा फटका दोन ठार, पाच जखमी
वरूड, ६ जून / वार्ताहर

तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वादळाचा जबर फटका बसला. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. यात वीज पडून एकजण ठार तर एक महिला घर पडल्याने खाली दबून मृत्युमुखी पडली. ५ जण जखमी

 

झाले मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख तर जखमींनाही आर्थिक मदत दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळ झाले. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने रस्त्यालगतची मोठी झाडे उन्मळून पडली. वृक्ष वीज वाहिन्यावर पडल्याने वीज तारा तुटल्या विजेचे खांब रस्त्यावर कोसळले. मिर्झापूर येथील विटाभट्टी वर काम करणारी सुरमती सुकरु धुर्वे (२२) ही झोपडी वजा घरात मुलगी ज्योती (२) सह आश्रयाला असताना वादळात झोपडी कोसळली. त्याखाली दबून सुरमतीचा मृत्यू झाला. तर ज्योतीच्या मेंदूला जबर दुखापत झाली. दुसऱ्या घटनेत चुडामननदीच्या पात्रात असताना वीज कोसळल्याने पंकज दिलीप पानसे (२१) चा मृत्यू झाला. या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून जखमी ज्योती चा वैद्यकीय अहवाल आल्यास तिलाही आर्थिक मदत दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी सांगितले. वादळाचा फटका आंबिया बहरालाही बसला असून यात संत्रा उत्पादकांचे लाखोचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाहणीवरून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. या वादळाच्या तडाख्याने वीज मंडळालाही फटका बसला असून वीज तारा तुटल्याने काही वेळ तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. पोलीस ठाण्याच्या परिसरातील शेकडो वर्षांचे लिंबाचे झाड वादळीवाऱ्यात क्वॉर्टरवर कोसळले मात्र त्यात कोणी जखमी झाले नाही.