Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीचे आता विधानसभेसाठी ‘चिंतन’
‘आबा’ ‘दादां’च्या उपस्थितीत रविवारी िपपरी-चिंचवडला राज्यस्तरीय बैठक
बाळासाहेब जवळकर
पिंपरी, ६ मे

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ‘शहाणे’ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यापुढे कोणतीही चूक न करता आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचे ठरविले आहे. त्याचाच

 

एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीच्या पराभवांची कारणमीमांसा करतानाच विधानसभेची रणनीती आखण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (७ जून) पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या या शिबिराबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली असून केवळ ६० जणांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कासारवाडीतील हॉटेल कलासागर येथे रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणाऱ्या या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, पालकमंत्री अजित पवार, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याच्या महापौर राजलक्ष्मी भोसले, पिंपरीच्या महापौर अपर्णा डोके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली आबणे, जिल्हाप्रमुख वल्लभ बेनके, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, कमल ढोले पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझम पानसरे आदींसह पक्षाचे ६० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या चिंतन बैठकीबाबत अतिशय गोपनीयता बाळगण्यात येत आहे. या शिबिरात केवळ निमंत्रितांनाच प्रवेश मिळणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत नेमके कोणते विषय चर्चिले जाणार आहेत, त्याविषयी गुप्तता बाळगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हाच मुख्य विषय राहणार असून आता झालेल्या चुका सुधारून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी व्यूहरचना करण्याविषयी यावेळी सविस्तर चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना याच भागात पक्षाला फटका बसला. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना मनासारखे मताधिक्य मिळू शकले नाही, पुण्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची विनाकारण फरफट झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. खासदार सुरेश कलमाडी यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र तरीही त्यांनी विजयश्री खेचून आणल्याचे चित्र राष्ट्रवादीसाठी हानिकारक ठरले आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या िपपरी पालिका क्षेत्रात प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवारास मताधिक्य मिळाले, याची बोच सर्वानाच आहे.
सत्तेची सगळी केंद्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादीचा अपमानास्पदरीत्या पराभव झाल्याचे शल्य राष्ट्रवादीत आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या दारुण पराभवामुळे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या शरद पवार यांच्या पदरी घोर निराशा आली. हमखास विजय मिळणार, अशी खात्री वाटणाऱ्या कोल्हापूर, हातकणंगले, मावळ, शिरुरच्या जागा हातच्या गेल्या. यासह अनेक गोष्टींचे चिंतन ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले.