Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात आज कुमार केतकर यांचे व्याख्यान
सातारा, ६ जून/प्रतिनिधी

‘लोकसत्ता’चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर रविवारी साताऱ्यात येत असून, त्यांचे

 

भारतातील राजकीय घडामोडींवर समर्थ सदनमध्ये भाषण होणार आहे.
सातारा जिल्ह्य़ातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिनकर झिंब्रे यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. ७) सायंकाळी साडेसहा वाजता समर्थ सदन, सातारा येथे होणार आहे, अशी माहिती दिनकर झिंब्रे मित्रमंडळाचे अध्यक्ष विश्वास दांडेकर व शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके यांनी दिली. सदर सत्कार समारंभ ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते होणार आहे. दिनकर झिंब्रे १९७३ पासून सातारा जिल्ह्य़ातील परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय आहेत. समता आंदोलन, साताऱ्यातील समाजवादी युवक दल, मुक्तांगण, एकता शिक्षण प्रसारक संस्था, झुणका-भाकर केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, संबोधी प्रतिष्ठान, क्रांतिपर्व नागरी सह. पतसंस्था या संघटना व संस्थांमधून झिंब्रे यांनी रचनात्मक, तसेच संघर्षांत्मक कार्यात आपला महत्त्वपूर्ण सहभाग दिला आहे. नामांतरासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. दलित चळवळीच्या विविध आंदोलनांतही त्यांनी भाग घेतला होता. विचारवेध संमेलने, थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला, मातोश्री भीमाबाई आंबेडकर महिला पुरस्कार आदी उपक्रमांत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता व आहे.
दिनकर झिंब्रे १९८९ पासून पत्रकारिता करीत असून, दै.जनशक्ती, महाराष्ट्र टाइम्स आदी दैनिकांचे ते वार्ताहर होते. सध्या ते ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. डॉ. आंबेडकर अकादमीच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठीच्या कार्यशाळांचे आयोजनही सातत्याने केले आहे. पत्रकार म्हणूनही ते निर्भिड वृत्तीने, संयमाने आपली लेखणी चालवतात. लोकांवरील अन्यायाला वाचा फोडणारी त्यांची अनेक वार्तापत्रे गाजली आहेत. मनमिळाऊ स्वभाव, हसतमुख वृत्ती व दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती यामुळे ते पत्रकार जगतात व कार्यकर्त्यांच्या वर्तुळात अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. पत्रकारिता व सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील झिंब्रे यांचे योगदान लक्षात घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केल्याचे दांडेकर व मांडके यांनी सांगितले.
दिनकर झिंब्रे यांच्या या सत्कार समारंभास कार्यकर्ते, नागरिक व पत्रकारांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही दांडेकर व मांडके यांनी केले आहे. किशोर बेडकिहाळ, प्रमोद कोपर्डे, प्रा. होवाळे, श्रीमती सुनीता सरदेशमुख, रघुवीर आपटे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या सत्कार समारंभानंतर लगेचच ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांचे ‘निवडणुकीनंतरचे राजकारण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.