Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कोपरगावला हवामान केंद्र उभारणीचे काम प्रगतीपथावर
महेश जोशी, कोपरगाव, ६ जून

येथील के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात केंद्र सरकारच्या भारतीय हवामान खात्याच्या सहकार्याने हवामान केंद्र उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील हे पहिले हवामान केंद्र येत्या तीन महिन्यांत कार्यान्वित

 

होईल. यासाठी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना या केंद्राद्वारे हवामानाची माहिती मिळू शकेल. तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, प्राचार्य डॉ. सुभाष पिंगळे, सचिव विधीज्ञ राजीव कुलकर्णी यांसह संचालक व प्राध्यापकांनी फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारच्या इंडियन मेट्रोलॉजीकल डिपार्टमेंट (आय. एम. डी.)ला महाविद्यालयात हवामान केंद्र (अॅटोमॅटिक वेदर स्टेशन) उभारणीबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाच्या आवारात टॉवरच्या उभारणीचे कामही सुरू झाले आहे. नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव तालुक्यात के. जे. सोमय्या महाद्यिालय अशा प्रकारचे हवामान केंद्र उभारणारे पहिले कॉलेज ठरले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुभाष पिंगळे व भूगोल विषयाचे प्रा. व्ही. एस. साळुंके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
अद्ययावत संगणक प्रणाली व सेंसॉरद्वारे येथील हवामान केंद्राद्वारे दररोजचे हवामान तापमान, वाऱ्याची दिशा, वेग, हवेतील आद्र्रता, पडणाऱ्या पावसाची मिलीमीटरमध्ये नोंद, सूर्यप्रकाशाचा वेग, हवामानविषयक विविध आगाऊ सूचना आदी माहिती या केंद्राद्वारे दररोज उपलब्ध होईल. भारतीय हवामान खात्याचे प्रमुख कार्यालय सिमला येथे होते. ते आता पूणे येथे आणण्यात आले. त्यामुळे येथील सर्व माहिती तेथेही सॅटेलाईटद्वारे मिळेल.
प्रादेशिक कार्यालय कुलाबा येथे आहे. तेथेही येथील माहिती समजू शकेल, असे प्रा. साळुंके म्हणाले. अशा प्रकारचे केंद्र नगर कॉलेज, शिर्डी येथे आहे. शेतकऱ्यांना हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. विभागप्रमुख प्रा. जी. के. चव्हाण यांचेही सहकार्य यासाठी लाभत आहे.