Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

एसटीही धावणार आता ‘सीएनजी’वर
पुणे, ६ जून / प्रतिनिधी

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गाडय़ा रस्त्यावर आणून सातत्याने सेवेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आता प्रदूषणाच्या मुद्दय़ावरही लक्ष केंद्रित केले असून, पुढील काळात ‘सीएनजी’वर धावणाऱ्या गाडय़ा रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची एक बस दापोडीतील एसटीच्या विभागीय

 

कार्यशाळेत तयार करण्यात आली आहे.
‘सीएनजी’वर धावणारी ही गाडी एसटीच्या परिवर्तन बसप्रमाणेच असून, सध्या तयार झालेल्या गाडीला मुख्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर अशा अडीचशे गाडय़ा तयार करण्यात येणार आहेत. सुमारे तीन महिन्यांमध्ये या गाडय़ा तयार होतील, अशी माहिती कार्यशाळेचे व्यवस्थापक अशोक कांबळे यांनी दिली. राज्यातील प्रमुख शहरांमधील प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेता यापूर्वी एसटीने ‘युरो थ्री’ प्रकारातील गाडय़ा रस्त्यावर आणल्या आहेत. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या सुमारे तीनशे गाडय़ा आहेत. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने प्रवासी वाहतुकीतील वाहने ‘सीएनजी’वर परावर्तित करण्याच्या दृष्टीने सध्या सर्वच पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये पीएमपीने काही गाडय़ा ‘सीएनजी’वर परावर्तित केल्या आहेत. त्याचप्रमाणे रिक्षांनाही ‘सीएनजी’वर परावर्तित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये पुढील काळामध्ये ‘सीएनजी’वर असलेल्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने एसटीने आतापासूनच पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ‘सीएनजी’वरील सुमारे अडीचशे बस तयार करण्यात येणार आहेत. ‘सीएनजी’ची उपलब्धता लक्षात घेता पुढील काळात या बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे.
‘सीएनजी’वरील बस तयार करण्यासाठी एसटीच्या ‘टू बाय टू’ या गाडीमध्ये काहीसे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. डिझेलच्या टाकीच्या जागी ‘सीएनजी’चे चार सििलडर बसविण्यात आली आहे. त्यांची क्षमता ३०० किलोची आहे.
सिलिंडर बसविण्यासाठी मूळ बसची उंची सहा ते सात इंचपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही बस तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाढला असला, तरी ‘सीएनजी’मुळे इंधनावरील खर्च कमी होणार असल्याने एसटीच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीनेही ही बस फायद्याची ठरणार असल्याचे बोलले जाते.