Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मौलाना आझाद विकास महामंडळाचे कर्ज माफ न केल्याने आंदोलन?
सोलापूर, ६ जून/प्रतिनिधी

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमाफीचा विचार न केल्याबद्दल मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने शासनाचा तीव्र निषेध नोंदविला आहे. मुस्लिम मतांच्या आधारावर सत्ता गाजविणाऱ्या राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने इतर सर्व आर्थिक विकास महामंडळांची कर्जे माफ करताना अल्पसंख्याकांच्या कर्जमाफीचा विसर पडल्याबद्दल

 

संघटनेने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शौकत तांबोळी, प्रदेशाध्यक्ष आरीफ बागवान, प्रदेश संघटक हसीब नदाफ, तसेच सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष शौकत पटेल व शहराध्यक्ष सलीम नदाफ यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात शासनावर टीका करण्यात आली आहे. शासनाने चालू वर्षांच्या अर्थसंकल्पात सर्व मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ करण्यात आल्याची घोषणा केली, मात्र त्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाच्या कर्जमाफीचा पद्धतशीरपणे विसर पडला. याबाबतची गंभीर दखल संघटनेने घेतली असून, लवकरच या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
केंद्र सरकारने अल्पसंख्याकांसाठी कल्याणकारी योजना अमलात आणल्या असून, त्याचा डांगोरा पिटला जात असताना राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाने गेल्या आठ वर्षांत फक्त ४१ कोटींचे कर्जवाटप केले आहे. त्यापैकी २० कोटींचे कर्ज फेडण्यात आले आहे. हजारो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या, तसेच विविध आर्थिक विकास महामंडळांचे कर्ज माफ करणाऱ्या शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचे फक्त २१ कोटींचे कर्ज माफ करू शकत नाही, याबद्दल संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.