Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

‘शिवाजीमहाराजांना एका समाजाचे मानणे चिंताजनक’
सांगोला, ६ जून/वार्ताहर

छत्रपती शिवाजीमहाराजांना संपूर्ण देश मानतो. अशा थोर राष्ट्रपुरुषाला केवळ एका समाजाचे मानणे अतिशय चिंताजनक आहे. अशा राष्ट्रपुरुषाला लहान करू पाहणाऱ्या मंडळींना समाजाने थारा देऊ नये, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघात मतदारांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दौऱ्यावर आले

 

असता धनगर परिषदेत शरद पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, राज्यातील काही मंडळी राष्ट्रपुरुषांकडे संकुचित दृष्टीने पाहत आहेत. राष्ट्रपुरुष हे एका समाजाचे बांधलेले नसतात. ते सर्व समाजाचे असतात. परंतु राज्यात काही मंडळी संकुचितवृत्तीने एकाच समाजाचे व आमचेच आहेत असे मानतात. हा राष्ट्रपुरुषावर अन्याय आहे. हल्ली समाजाचे नेतृत्व घेऊन काही संघटना पुढे येत आहेत. हे दुर्दैवाचे आहे.
मराठा समाजाला राजकीय आरक्षण देण्यास आपला विरोध आहे, असे सांगून पवार म्हणाले की, मराठा समाजातही गरीब व्यक्ती मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांना आर्थिक दुर्बल घटकातील शैक्षणिक व इतर आरक्षण द्यावे.
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पराभवाविषयी बोलताना पवार म्हणाले, त्यांचा पराभव दु:खदायक आहे. आमच्याबरोबर होते त्यावेळी पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयी केले. आता ते काँग्रेसबरोबर गेले तेथे पराभव झाला आम्हीही त्यांच्याबरोबर आहोत तरीही राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांची लोकसभेवर निवड झाल्याने दोन जागा रिक्त असून, त्यातील एक जागा रामदास आठवले यांना देण्यास राष्ट्रवादी तयार आहे. त्यास काँग्रेस पक्षानेही सहकार्य करावे, असे म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २६ जागा लढविल्या असताना त्यांना १९.८ टक्के मतदान झाले, तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या मतदान १९.५ टक्के झाले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मतात फरक ४० हजारांचा आहे. परंतु निवडून आलेल्या जागेत आमच्यापेक्षा दुपटीचा फरक आहे. याबाबत ५ जूनला राष्ट्रवादीची बैठक होऊन निवडणुकीचे विश्लेषण करणार आहे.