Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नव्या कार्यकारिणीवरून बसपाच्या बैठकीत गदारोळ
चंद्रपूर, ६ जून/ प्रतिनिधी

बहुजन समाज पार्टीतील अंतर्गत वादाला तोंड फुटले असून भास्कर भगत यांना जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आल्याने बसपाच्या बैठकीत चांगलाच गदारोळ उडाला. जिल्हाध्यक्ष बदला, अन्यथा पक्षाचे काम करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने हा वाद चांगलाच रंगला

 

आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासूनच बसपात अंतर्गत वाद सुरू आहे. २००४ सालच्या निवडणुकीत एक लाखापेक्षा जास्त मते घेणारा व त्यानंतर सातत्याने ‘कॅडर’ वाढवणारा पक्ष म्हणून भाजप, काँग्रेसने धास्ती घेतली. मात्र आता या पक्षालाही अंतर्गत कलहाचे ग्रहण लागले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवारीचा लिलाव होतो. लिलावाला कॅडरबेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानेच या वादाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पोद्दार यांना उमेदवारी घोषित झाली होती पण, अगदी वेळेवर डॉ. पोद्दार यांना डावलून अॅड. दत्ता हजारे यांना पक्षाची उमेदावारी देण्यात आली. यामुळे कॅडरबेस कार्यकर्ते नाराज झाले. या नाराजीतूनच ‘कॅडर बेस’ असतानाही ‘हत्ती’ केवळ ५७ हजार मते प्राप्त करू शकला. पाच वर्षांपूर्वी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पक्षाची पीछेहाट होताच पक्षश्रेष्ठी जागे झाले. खुद्द पक्षाच्या सुप्रीमो, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कॅडर मते गेली कुठे? हा त्यांचा प्रश्न राज्य कार्यकारिणीला घाम फोडणारा ठरला. लगेच प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांना जिल्हय़ाची कार्यकारिणी बदलवून विधानसभा निवडणुकीपूर्वी सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट सोपवण्यात आले. गरूड नवीन पदाधिकाऱ्यांना पुढे करण्याच्या तयारीत असतानाच प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रभारी सुरेश साखरे यांनी जिल्हाध्यक्षांची घोषणा केली. गेल्या पाच वर्षांपासून जिल्हाध्यक्ष असलेले भास्कर भगत व त्यांच्या सहकाऱ्यांवरच त्यांनी विश्वास टाकला आणि येथेच वादाला तोंड फुटले.
पक्ष कार्यकर्त्यांमध्ये भास्कर भगत यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. पक्षात कार्यकर्त्यांना संघटित ठेवण्यात ते अपयशी ठरल्याची ओरड आहे व त्यामुळेच या निवडणुकीत पक्षाच्या कॅडरनेही पक्षाकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. भगत यांची फेरनियुक्ती अनेकांना अमान्य असल्याने बुधवारी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला पक्षाचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. भास्कर भगत यांच्यासह नवीन पदाधिकारी मात्र उपस्थित नव्हते. यावेळी भगत यांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचण्यात आला. पक्षाच्या वाताहतीला ते जबाबदार असून पक्षश्रेष्ठींनी त्यांना पदावरून हाकलावे, अशी एकमुखी मागणी केली. तसेच प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपुरात येऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात व नवीन अध्यक्ष ठरवावा, असा ठराव घेण्यात आला. ८ जूनला त्यासंबंधी एक बैठक होण्याची शक्यता बळावली आहे. पक्षनेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केले तर येत्या विधानसभेत पक्ष रसातळाला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष बदलला नाही तर पक्ष सोडून जाण्याची तयारी जुन्या व विश्वासातील कार्यकर्त्यांनी दिल्याने वरिष्ठ पेचात पडले आहेत. काहीही करा जिल्हाध्यक्ष बदला ही नाराज कार्यकर्त्यांची मागणी कायम आहे. यामुळे जिल्हाध्यक्षांबाबत सोमवारनंतरच निर्णय होईल.