Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात दोन लाखांची ब्राऊन शुगर जप्त
कोल्हापूर, ६ जून/प्रतिनिधी

ब्राऊन शुगरच्या आहारी गेलेल्या युवकांची कोल्हापुरातील संख्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी चिंता वाटावी इतकी होती. शहरातील काही ठिकाणी ब्राऊन शुगर सहज मिळत होती. मात्र ब्राऊन शुगरच्या विरोधी जनजागरण मोहीम प्रभावीपणाने राबविण्यात आल्यानंतर ब्राऊन शुगरचे व्यसन संपुष्टातच

 

आले होते. मात्र बुधवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकावर तिघा युवकांकडून सुमारे दोन लाख रुपयांची ब्राऊन शुगर जप्त केल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी अटक केलेले तिघेही युवक पुण्याहून ही ब्राऊन शुगर घेऊन कोल्हापुरात तिची विक्री करण्यासाठी आले होते. कोल्हापुरात ही ब्राऊन शुगर ते कोणाला विकणार होते हे मात्र स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २० लाख रुपये किंमत असलेली सुमारे २०० ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्याचा कोल्हापुरातील गेल्या वीस वर्षांतील पहिलाच प्रकार आहे. वॉटरबॅगच्या तळाशी एका पुडीत ही ब्राऊन शुगर लपविण्यात आली होती.
जयराट ज्येम्स पॅटरीक, डुबीयार, विशाल भैरवनाथ वाघमारे (दोघेही रा. पुणे) आणि शरीफअली मुझफरअली पठाण (रा.चितोड, राजस्थान) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. हे तिघेही युवक ब्राऊन शुगर घेऊन कोल्हापूरला येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकात साध्या वेषात पोलिसांनी सापळा लावला. संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या तिघा युवकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या वॉटरबॅगच्या तळाशी ब्राऊन शुगर असल्याचे आढळून आल्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली.