Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

भांडवली अर्थव्यवस्थेला शासनाने पायबंद घालावा- थोरात
पुणे, ६ जून/प्रतिनिधी

‘‘सहकारी साखर कारखान्यांच्या क्षेत्रामध्ये सध्या खासगी साखर कारखानदारी डोके वर काढीत आहे. अशा परिस्थितीत भांडवली अर्थव्यवस्था प्रबळ होऊन आर्थिक उन्नती खुंटू नये, यासाठी शासनाने त्यास वेळीच पायबंद घालावा,’’ अशी मागणी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते व

 

स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांनी आज येथे मांडली.
महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘कै. नरुभाऊ लिमये स्मृती-आर्यभूषण पुरस्कार’ थोरात यांना, तर ‘कै. नरुभाऊ लिमये पत्रकारिता पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ समाजवादी नेते मोहन धारिया यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना संगोराम म्हणाले, ‘नरुभाऊंच्या नावाने पुरस्कार मिळणे ही केवळ आनंदाचीच नव्हे, तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी पत्रकारितेचे धडे गिरवित असताना नरुभाऊ या क्षेत्रात उच्चस्थानी होते. ते निर्भीड व निस्पृह पत्रकार होते. त्यांचाच आदर्श ठेवून मी पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या पत्रकारितेत पूर्वीसारखा निर्भयपणा राहिला नाही. सर्वाना खूश ठेवण्याची आजची पत्रकारिता होत आहे. दुसरीकडे ती वेगवेगळ्या दबावाला बळी पडते आहे. त्यामुळे वाचकांना सत्य कळत नाही. वेगवेगळी प्रलोभने पत्रकारांसमोर फेर घालत असतात. त्यापासून दूर राहून सरळमार्गी पत्रकारिता कठीण झाली आहे. मात्र सर्व प्रलोभनांपासून दूर राहून निर्भय पत्रकारिता करता येऊ शकते, हे नरुभाऊंकडून शिकलो. त्यांचा आदर्श आयुष्यभर पाळला व पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य सांगत राहिलो. यापुढेही हाच आदर्श पाळत राहाणार आहे.’ ‘भाऊसाहेब थोरात यांचा गौरव हा सर्व सहकारी चळवळीचा गौरव आहे’, असे सांगून धारिया म्हणाले, ‘थोरात हे समाजासमोरील आदर्श आहे. त्यामुळे हा आदर्शवादाचाही गौरव आहे. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, तसेच या सत्तेला संरक्षण देण्यासाठी गुंडांचा वापर हे दुष्टचक्र तोडावे लागेल. ते आपण घडवून आणू शकतो. कारण आजही जनता प्रामाणिक आहे.’ शिंदे यांनीही थोरात यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, ‘सध्याचा सहकार हा स्वाहाकार झाला आहे. मात्र थोरात यांनी सहकारामध्ये नीतिमत्ता टिकविली आहे. हा सहकार नीतिमत्ता व ध्येयवादाचा आहे.’