Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

क्रीडा

सॅफिनाचा सफाया
स्वेतलाना कुझ्नेत्सोवा अजिंक्य

पॅरिस ६ जून/पीटीआय

रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने आज फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. तिने आपलीच सहकारी व अग्रमानांकित खेळाडू दिनारा सॅफिनास सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सॅफिनास आतापर्यंत एकही ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. आजच्या लढतीत ती अव्वल दर्जास साजेसा खेळ करील अशी अपेक्षा होती. तथापि ग्रॅन्ड स्लॅमच्या यशाबाबत सॅफिनापेक्षा अनुभवात वरचढ असलेल्या कुझ्नोत्सोवाने तिला ६-४, ६-२ असे सहज पराभूत केले व विजेतेपदाचा वेध घेतला. यापूर्वी तिने २००४ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

ऑस्ट्रेलियाला सलामीलाच फटका; वेस्ट इंडिज सात विकेट्सनी विजयी
ओव्हल, ६ जून / वृत्तसंस्था

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्याच सामन्यात ख्यातनाम संघ पराभूत होण्याची मालिका दुसऱ्या दिवशी सुरू राहिली. इंग्लंडला नेदरलॅण्ड्सकडून पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वेस्ट इंडिजनेही ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात पराभवाचा जबरदस्त तडाखा दिला. ख्रिस गेलच्या ५० चेंडूंतील ८८ धावांच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलियाने ठेवलेले १७० धावांचे आव्हान पालापाचोळ्यासारखे उडून गेले. गेलने सहा षटकार आणि सहा चौकारांसह आपली ही वादळी खेळी सजविली. त्याला सलामीवीर फ्लेचरचीही (५३) उत्तम साथ लाभली.

बुकॅनन, हेडन सायमण्ड्सच्या पाठीशी
मेलबर्न, ६ जून / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा माजी आघाडीवीर मॅथ्यू हेडन आणि ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकॅनन यांनी अ‍ॅंड्रय़ू सायमण्ड्स याच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले आहे. हेडन, बुकॅनन यांनी म्हटले आहे की, सायमण्ड्स याच्या अडचणीच्या काळात सर्वानीच त्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या कठीण प्रसंगातून त्याला सावरले नाही तर त्याची कारकीर्द अकाली संपुष्टात येण्याची भीती आहे.

नेदरलॅण्ड्सचा इंग्लंडला झटका
सलामीलाच इंग्लंडचा धक्कादायक पराभव

लंडन, ५ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल अपेक्षित आहेत. मात्र विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच असा निकाल मात्र अपेक्षित नव्हता. तोदेखील इंग्लंडसारख्या आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या संघाकडून. नेदरलॅण्ड्सने या सामन्यात इंग्लंडला चार विकेट्सनी पराभूत करीत धक्कादायक अशा निकालाची नोंद करीत विजयी सलामी दिली.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६२ धावा जमविल्या होत्या.

इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस
प्रसारमाध्यमांची टीका

लंडन, ६ जून, वृत्तसंस्था

ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच सामन्यात हॉलंडसारख्या ‘लिंबू टिंबू’ संघाकडून पराभव पत्करल्याबद्दल इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांनी इंग्लंड संघावर जोरदार टीका केली आहे. इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे येथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
हॉलंड संघाला एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अद्याप अधिकृत दर्जाही दिलेला नाही. अशा संघाने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवावा हे येथील प्रसारमाध्यमांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.

इंग्लंडसाठी अस्तित्वाचा प्रश्न; आज पाकिस्तानशी झुंज
लंडन, ६ जून / एएफपी

नेदरलॅण्ड्सकडून सलामीच्याच सामन्यात पराभवाचा अनपेक्षित धक्का बसलेला इंग्लंडचा संघ उद्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला सामोरा जात आहे. ही लढत इंग्लंडसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. अव्वल आठ संघांमध्ये सामील होण्यासाठी इंग्लंडला ही लढत जिंकावीच लागेल. नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने ऑफ स्पिनर ग्रॅमी स्वान व अष्टपैलू खेळाडू दिमित्री मॅस्कारेन्हास यांना खेळविले नव्हते तर केव्हिन पीटरसन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. याचा फटका त्या सामन्यात इंग्लंडला बसला.

पेस-ड्लौहीला पुरुष दुहेरीचे विजेतेपद
पॅरिस, ६ जून / पीटीआय

भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस याने ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांच्या यादीत आता आणखी एका विजेतेपदाचा समावेश केला. चेक प्रजासत्ताकचा त्याचा सहकारी ल्युकास ड्लौही याच्यासह त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. वेस्ली मूडी व डिक नॉर्मन या जोडीवर त्यांनी ३-६, ६-३, ६-२ असा विजय मिळविला. दोघांचे हे एकत्रितपणे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम होते. तीन वर्षांच्या अंतराने पेसने हे विजेतेपद पटकाविले. मार्टिन डॅमसह त्याने २००६मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. पेसने याआधी १९९९ व २००१मध्ये महेश भूपतीसह फ्रेंच ओपन विजेतेपदाचा इतिहास घडविला होता. यावेळी पेस-ड्लौही जोडीला पहिला सेट गमवावा लागल्यानंतर चाहत्यांमध्ये थोडी निराशेची भावना निर्माण झाली होती, पण पुढील दोन सेट जिंकून दोघांनीही त्यांचा मूड बदलून टाकला.

दक्षिण आफ्रिका विजयी सलामीसाठी उत्सुक; स्कॉटलंडपुढे विजयाचाच पर्याय
लंडन, ६ जून / एएफपी

दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० विश्वचषकातील झुंज उद्या रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेची मुख्य स्पर्धेतील ही पहिलीच लढत आहे, मात्र स्कॉटलंडसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची असेल. स्कॉटलंडला न्यूझीलंडकडून सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्याच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल.
दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास मात्र चांगलाच उंचावलेला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील मालिका जिंकल्यामुळे ते चांगलेच फॉर्मात आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथही याला दुजोरा देतो. तो म्हणतो, गेल्या वर्षभरात आम्हाला चांगले यश लाभले आहे. जागतिक क्रमवारीतही आम्हाला अव्वल स्थान मिळाले. एक मात्र खरे की आम्हाला एखादी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकायची आहे. स्मिथचे हे म्हणणे खरे होण्यासाठी त्यांना भूतकाळातून काही शिकावे लागणार आहे. १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांचा वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड उपान्त्य फेरीत अखेरच्या चेंडूवर धावचीत झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले होते. त्यानंतर चार वर्षांनी पावसाने दक्षिण आफ्रिकेचा घात केला. डकवर्थ-लुईस नियमामुळे गटसाखळीतच त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

सायमण्ड्स मायदेशी परतला
मेलबर्न, ६ जून/वृत्तसंस्था

माझ्या कारकीर्दीबाबत मला बराच विचार करायचा आहे. विचार केल्यानंतरच मी प्रसारमाध्यमांशी बोलेन, असे ऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त अष्टपैलू खेळाडू अँड्रय़ू सायमंड्स याने आज सांगितले.
बेशिस्त वर्तनामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातून हकालपट्टी करण्यात आलेला सायमंड्स आज मायदेशी परतला. ब्रिस्बेन येथे त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी मायकेल ब्राऊन यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी त्याला प्रतिक्रियेसाठी गराडा घातला. त्यावेळी त्याने छापील निवेदन वाचून दाखविले.या निवेदनात सायमंड्स याने म्हटले आहे की, कारकीर्दीबाबत पुढे काय करायचे याबाबत मला अजून विचार करावयाचा आहे, तसेच मित्रमंडळींशी चर्चा करायची आहे. त्यानंतरच मला काय म्हणायचे आहे हे मी तुम्हाला सांगेन. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने सायमंड्स याच्याशी केलेला करार संपण्यास अजून एक वर्ष बाकी आहे.