Leading International Marathi News Daily

रविवार, ७ जून २००९

विविध

विमानाचे अवशेष शोधण्यासाठी फ्रान्सची अणुपाणबुडी रवाना
रेसिफ,ब्राझील ६ जून/एएफपी

गेल्या आठवडय़ात अ‍ॅटलांटिक महासागरात कोसळलेल्या एअर फ्रान्सच्या विमानाचे अवशेष अजूनही हाती लागले नसून गेल्या सहा दिवसांतील शोधकार्य त्यामुळे व्यर्थ ठरले आहे. आता फ्रान्सची अणुपाणबुडी या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी ब्राझीलच्या ईशान्येकडे १००० किमी अंतरावरून निघाली आहे. या विमानाचे ब्लॅकबॉक्स अजून सापडलेले नाही. एअर फ्रान्सच्या एएफ ४४७ फ्लाईटचे हे विमान सोमवारी रिओ-डी-जानिरो येथून पॅरिसकडे जात असताना समुद्रात कोसळले.

अ‍ॅमेझॉनमध्ये २५ ‘रेड इंडियन्स’ आंदोलकांसह ३४ ठार
लिमा, ६ जून/पीटीआय

पेरू देशातील दूरस्थ अ‍ॅमेझॉन प्रदेशातील कुरवा डेल डियाब्लो या भागात तेल व वायू शोधनाच्या कामाला विरोध करणाऱ्या सुमारे पाच हजार ‘रेड इंडियन्स’नी (मूळ आदिवासी रहिवासी) रास्ता रोको केले असता पोलिसांनी केलेल्या कारवाईच्यावेळी चकमकीत ३४ जण ठार झाले. त्यात नऊ पोलीस व २५ निदर्शकांचा समावेश आहे. मृतांच्या आकडय़ाबाबत संदिग्धता आहे. काल पहाटेपूर्वीच तेथे हिंसाचाराचा आगडोंब उसळला.

भारताविरोधात ‘शस्त्रसज्ज’ होण्यासाठी अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीचा उपयोग
अमेरिकेच्या अहवालातील मत

वॉशिंग्टन, ६ जून/पी.टी.आय.

दहशतवादविरोधात लढण्यासाठी अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या मदतीचा बराच मोठा हिस्सा पाकिस्तानने भारताविरोधात शस्त्रसज्ज राहण्यासाठी वापरला असल्याचे ‘पँटागॉन’मध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. दहशतवादाविरोधात लढताना लष्कर सुसज्ज करण्यासाठी तसेच आधुनिक शस्त्रांचा वापर करता यावा म्हणून अमेरिकेकडून पाकिस्तानला मदत केली गेली. मात्र त्या मदतीचा वापर पाकिस्तान भारताविरोधात युद्धसक्षम राहण्यासाठी केला असल्याचे या अहवालाने स्पष्ट केले आहे.

मुंबई हल्ल्यात वापरलेली बोट पुरवणाऱ्याविरुद्ध अटक वॉरंट
इस्लामाबाद, ६ जून/पीटीआय

मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेली बोट पुरवणाऱ्या बलुचिस्तानातील एका इसमाविरुद्ध पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. दरम्यान, २६/११ च्या या हल्ल्यातील लष्कर-ए-तय्यबाच्या पाच दहशतवाद्यांवरील खटल्याची सुनावणी मात्र २० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मेक्सिकोत पाळणाघरात लागलेल्या आगीत ३० मुलांचा मृत्यू
हरमोसिलो (मेक्सिको), ६ जून/वृत्तसंस्था

येथील वायव्य प्रांतातील सोनोरा भागात एका पाळणाघरात (डे केअर सेंटर) लागलेल्या आगीमध्ये ३० मुलांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक मुले व नागरिक जखमी झाल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. मृत्यू झालेली मुले १ ते ५ या वयोगटातील असल्याचे सरकारी प्रवक्ते जोस लारिंगा यांनी सांगितले. काल दुपारी तीन वाजता सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या ‘एबीसी डे केअर सेंटर’च्या नजीक असणाऱ्या इमारतीला आग लागली त्यानंतर ती फैलावत या पाळणाघरापर्यंत पोहोचली. तोपर्यंत बऱ्याच पालकांनी आपली मुले पाळणाघरातून नेली होती. मात्र तरीही घटनेच्यावेळी या पाळणाघरात सुमारे १२० मुले होती, अशी माहिती लारिंगा यांनी दिली. प्रशासनाने ही आग दोन तासांमध्ये आटोक्यात आणली. पण या दुर्घटनेत ३० मुलांचा मृत्यू, तर इमारतीत आणि शेजारील इमारतींमध्ये असलेली १०० हून अधिक मुले व नागरिक जखमी झाले. बहुतांश मुलांचा मृत्यू गुदमरण्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. पाळणाघराच्या शेजारील इमारतीमध्ये कार आणि टायर डेपो आहे. तेथे टायरने पेट घेतल्यामुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अध्यक्ष फिलिप कॅल्ड्रॉन यांनी आपल्या शोकसंदेशात जखमींवर तातडीने उपचाराची अपेक्षा व्यक्त केली. या आगीच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे.

दरड कोसळून चीनमध्ये २६ ठार
बीजिंग, ६ जून/पीटीआय

नैर्ऋत्य चीनमध्ये एका लोहखनिज प्रकल्पावर, तसेच राहात्या घरांवर दरडी कोसळून २६ ठार, तसेच अनेकजण जखमी झाले आहेत, असे सरकारी दूरचित्रवाणीने आज सांगितले. वुलॉँग परगण्यात काल दरड कोसळल्याने मोबाईल फोन कंपनीत काम करणारे सात कर्मचारी, तर इतर १९ खाणकामगार मरण पावले. सात जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून, त्यांच्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. खाणीत गाडल्या गेलेल्या २७ कामगारांसह ५२ जण बेपत्ता आहेत. त्यांच्यात २१ शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. सुमारे ५०० जणांचे पथक मदतकार्य करीत असून, वाचलेल्यांचा ते शोध घेत आहेत. गाडल्या गेलेल्या व बेपत्ता असलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आदेश चीनचे अध्यक्ष हु जिंताओ व पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिशय दाट लोकवस्ती असलेला चोंगक्विंग भाग नैसर्गिक वायू व खनिज संपत्तीने समृद्ध आहे.