Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गाइड प्रवेशाचे..
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ तद्वतच बारावीची परीक्षा संपली की आरोग्यविज्ञान व अभियांत्रिकी/ तंत्रविज्ञान विद्याशाखांच्या प्रवेश परीक्षांची धांदल सुरू होते. मेमध्ये प्रवेशपरीक्षा, जूनला निकाल व प्रवेश प्रक्रियेची सुरुवात, जुलैत प्रत्यक्ष प्रवेश आणि ऑगस्ट महिन्यात वर्ग सुरू असा साधारण घटनाक्रम असतो. इच्छित प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या घरात आनंदाचे तर न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या घरात नाराजीचे वातावरण असते. हवा तो प्रवेश मिळालेले विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू होऊन अध्ययनास प्रश्नरंभ करतात आणि पाहिजे ती विद्याशाखा न मिळालेले विद्यार्थी पर्यायी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन पुढची मार्गक्रमणा करू लागतात. पैकी आरोग्य विज्ञान विषयक अभ्यासक्रमांची माहिती आपण येथे घेणार आहोत.
आरोग्य विज्ञानविषयक अभ्यासक्रम दोन प्रकारचे आहेत
’ वैद्यकीय - आधुनिक वैद्यक - एमबीबीएस, दंतशास्त्र- बीडीएस, आयुर्वेद- बीएएमएस,

 

होमिओपाथी - बीएचएमएस व युनानी- बीयूएमएस.
’ परावैद्यकीय - शुश्रुषाशास्त्र- बीएस्सी नर्सिग, भौतिकोपचार - फिजिओथेरपी (बीपीटीएच), व्यवसायोपचार - ऑक्युपेशन थेरपी (बीओटीएच), वाणी व भाषा उपचार- स्पीच अँड लँग्वेज थेरपी (बीएएसएलपी).
उच्च गुणप्रश्नप्त विद्यार्थ्यांंची पसंती वैद्यकीय विद्याशाखांना वर दिलेल्या क्रमाने असते. मध्यम गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना परावैद्यकीय शाखांना प्रवेश मिळतो. यामध्ये बीएस्सी नर्सिग व बीपीटीएच यांना अग्रक्रम असतो. हे सर्व अभ्यासक्रम शासकीय तसेच खासगी महाविद्यालया/ विद्यापीठातून शिकविले जातात. शासकीय संस्थांचे शुल्क बरेच कमी व त्या अभ्यासक्रमासाठी सर्व संस्थात सारखे असते. खासगी संस्थांचे शुल्क बरेच जास्त असते व ते अभ्यासक्रम तसेच संस्थेनुसार बदलते. प्रवेशासंबंधीचे नियम दरवर्षी बदलत असतात, त्यामुळे आपल्याला जेथे प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संस्थेच्या यंदाच्या माहितीपुस्तिकेचे काळजीपूर्वक परिशीलन करणे आवश्यक ठरते.
एमबीबीएस व बीडीएसला प्रवेश मिळविण्यासाठी सर्वाधिक विद्यार्थी इच्छुक असतात. कारण या शाखांचा विकास प्रयोगसिद्ध संशोधनातून झाला असून त्यात नित्य नवी भर पडते. अशा सतत संपन्न होणाऱ्या अद्ययावत ज्ञानातून उपलब्ध होणाऱ्या नवीन उपचार व निदान पद्धती तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामुग्री यामुळे या शाखांना जगभर मान्यता व लोकप्रियता लाभली आहे. त्यातील पदव्युत्तर शिक्षण हे एक उत्तम करिअर मानले जाते.
आधुनिक वैद्यकात तसेच दंतशास्त्रात बरेच विषय व प्रत्येक विषयात उपशाखा असल्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी एमबीबीएस वा बीडीएस नंतर पुन्हा प्रवेश परीक्षा द्यावी लागते. काही विद्यार्थी पदवीनंतर जीआरई, टॉफेल अशा परीक्षा देऊन परदेशी जातात. इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांबाबतही परिस्थिती साधारण अशीच आहे.
एमबीबीएस हा अभ्यासक्रम साडेचार वर्षाचा असून त्यानंतर एक वर्षाचे आंतरवासिय प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच पदव्युत्तर प्रवेश परीक्षेस बसता येते. इतर सर्व वैद्यक शाखांचे पदवी अभ्यासक्रम व प्रशिक्षणदेखील याच मुदतीचे आहेत. बीडीएस चार वर्षाचा व प्रशिक्षण एक वर्षाचे, वाणी व भाषा उपचार, भौतिकोपचार व शुश्रुषाशास्त्रदेखील चार वर्षाचे, मात्र वाणी व भाषा उपचार प्रशिक्षण एक वर्षाचे, भौतिकोपचारात सहा महिन्यांचे तर शुश्रुषाशास्त्रात प्रशिक्षण नाही. यावरून या पदव्यांना प्रत्येक किमान किती काळ लागतो ते लक्षात यावे. आयुर्वेद व होमिओपथी पदवीधर लहान मोठय़ा गावा-शहरातून दवाखाना (जनरल प्रॅक्टीस) वा रुग्णालये चालवतात किंवा काहीजण शासकीय अथवा खासगी रुग्णालयात नोकरी करतात. आता या शाखांमध्येही काही प्रमाणात पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत आहे. इतक्या विविध प्रकारच्या वैद्यक शाखा एवढय़ा प्रमाणात जगात इतरत्र आढळत नाहीत. त्यांचे रुग्णसेवेतील स्थान तसेच सदर पदवीधरांकडून आधुनिक औषधांचा वापर इ. बाबींबद्दल कायदेशीर व सामाजिक मुद्दे काही वेळा उपस्थित होतात. या तसेच युनानी व निसर्गोपचार आणि योगोपचार शाखांना पर्यायी वैद्यक असेही संबोधले जाते.
गेल्या वर्षीच्या व यंदाच्या परिस्थितीतील महत्त्वाचा फरक म्हणजे आरोग्यविज्ञान शाखांना पुनश्च येऊ घातलेले महत्त्व. जागतिक आर्थिक मंदीमुळे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखांकडील ओढा काही प्रमाणात कमी व्हावा. कारण हमखास व लगेच भरपूर पगाराची नोकरी देण्याची हमी आता त्या शिक्षणात कितपत राहिली आहे, याचा विचार केला जाईल. त्याउलट वैद्यकीय क्षेत्र हे स्वयंव्यवसायी स्वरूपाचे असल्याने त्या वृत्तीच्या विद्यार्थ्यांना ते अधिक आवडावे. बहुसंख्य आरोग्यविज्ञान पदवीधर स्वतंत्र व्यवसाय करतात व अगदी थोडे नोकरी करतात.
याला अपवाद परिचारिकांचा, पण त्यांना उत्तम पगाराची नोकरी अगदी सहज मिळते. सुदैवाने दक्षिणेकडील काही राज्ये (केरळ, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक) सोडली तर शुश्रुषा व्यवसायाबाबत समाजात अकारण काही गैरसमज आढळतात. खरे तर ते एक अत्यंत चांगले काम असून त्यात पैशासोबत उत्तम कार्यसमाधानही लाभते. जगभर सर्वत्र कुशल परिचारिकांना प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे आता अनेक छोटय़ा शहरातूनही या शिक्षणाची सोय उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील मुला-मुलींनी याचा गंभरीपणे विचार करावा असे सुचवावेसे वाटते. खरे तर प्रस्तुत लेखाच्या आवाक्याबाहेर जाऊन असेही सुचवावेसे वाटते की बँकांनी व संपन्न संस्थांनी लायक मुला-मुलींना यासाठी सुलभ शैक्षणिक कर्ज द्यावे, वाटल्यास त्यांच्याकडून मोबदला मुदत सेवेचे हमीपत्र भरून घ्यावे. सध्याचे धकाधकीचे जीवन, त्यातील वाढते ताणतणाव यामुळे अपघात, हृद्रोग, श्वसनविकार, विविध शस्त्रक्रिया यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा सर्व रुग्णांना भौतिकोपचाराचीही गरज असते. मोठय़ा रुग्णालयामध्ये त्यासाठी भौतिकोपचार तज्ज्ञ नियुक्त केले जातात. त्यांना पगार चांगला मिळतो, शिवाय स्वतंत्र व्यवसायही करता येतो. म्हणून अनेक विद्यार्थी बीपीटीएच या अभ्यासक्रमास पसंती देतात.
एकूणच स्वतंत्र व्यवसाय करण्याची संधी देणारे वैद्यकीय क्षेत्र हे त्या वृत्तीच्या विद्याथ्यार्ंना अधिक आवडावे. खरे तर गणित की जीवशास्त्र ही निवड करण्यापूर्वीच याबाबत समुपदेशन व्हायला हवे. मात्र बरेचसे विद्यार्थी असा विचार न करता दोन्ही विषय घेतात आणि नंतर त्यांचा गोंधळ उडतो. प्रवेशापूर्वी तरी त्यांनी या मुद्यावर मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर.
गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’मध्ये याच विषयावर लिहिलेल्या लेखानंतर अनेक विद्यार्थी व पालकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधला व समुपदेशन तसेच प्रवेशासाठी सहकार्य घेतले. त्यामुळे आम्हालाही खूप समाधान वाटले. यंदाही कोणता अभ्यासक्रम घ्यावा, त्यासाठी कुठे - कसा अर्ज करावा, प्रश्नधान्यक्रम, प्रवेशाची शक्यता इ. बाबत काही शंका-प्रश्न असल्यास विद्यार्थी वा पालकांनी दूरध्वनी इ-मेल द्वारा संपर्क करावा अथवा समक्ष भेटण्यास हरकत नाही.
डॉ. दाक्षायणी पंडित (एम.डी.), डॉ. पद्माकर पंडित (एम.डी.)
दूरध्वनी ०२० - २५५३८१९०, ९९७६५८८८२९, ९८२३१३३५२३.
ई मेल -ptpandit@gmail.com, dakshapp@yahoo.com
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन! अभिनंदन तुमच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल! आता आपण सगळेच प्रवेशपरीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात आहोत. त्याची पूर्व तयारी म्हणून या लेखाचे प्रयोजन! अभियांत्रिकीच्या प्रवेशासंबंधी अजूनही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आढळतो. काय करावे? कसं करावे? कोणतं कॉलेज? कोणती ब्रांच? नियम? फिज्? अनेक प्रश्न आता घेर करून उभे असतात, त्यांना सामोरे जाण्यासाठी आजचा लेख उपयोगी ठरावा.
हा विषय तसा किचकट नसला तरी गुंतागुंतीचा मात्र नक्कीच आहे.
मी बीई मेकॅनिकल झाल्यानंतर गेली २५ वर्ष मी अभियांत्रिकी महाविद्यालयांशी निगडीत आहे, प्रथम विद्यार्थी आणि मग प्रश्नध्यापक म्हणून. थोडक्यात सांगायचे तर या अभियांत्रिकी महाविद्यालयातील आजपर्यंत बदलत गेलेल्या प्रवेशप्रक्रियेचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यामुळेच मी तुम्हा सगळ्यांना या प्रक्रियेतील खाचखळगे समजवून, त्यातून मार्ग कसा काढायचा ते सांगू शकतो, आपणा सर्वाच्या मनात रुजलेल्या चुकीच्या कल्पनांना विराम देऊन नवीन प्रकारे विचारांना दिशा देऊ शकतो.
आतापर्यंत एक गोष्ट आपणा सर्वाना पटली असेल की बारावीच्या मार्काना आता काही अर्थ उरलेला नाही. केवळ एक फॉरमॅलिटी म्हणून ही बारावीची परीक्षा द्यावी लागते. अर्थात त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवायला हवे की बारावीत किमान पन्नास टक्के गुण (पी.सी.एम.मध्ये) मिळाले आणि प्रवेश परीक्षेत किमान १ मार्क मिळाला तरच आपण अभियांत्रिकी प्रवेशास पात्र ठरतो.
महाराष्ट्र राज्यात एकूण २२२ पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये असून एकूण जागा सत्तर हजारांपेक्षा अधिक आहेत. यावर्षी आणखी काही महाविद्यालये सुरू होण्याची पण शक्यता आहे.
कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की, सीईटीचा निकाल लागला की लगेच सगळी गडबड सुरू होईल. परंतु असं नाही. १४-१५ तारखेला जरी निकाल लागला तरी ऑप्शन फॉर्म भरायला अजून बराच अवकाश आहे. या अवधीमध्ये आपल्याला २ महत्त्वाची कामं करायची आहेत.
१. जर आपण ए.आय.ई.ई.ई. परीक्षा दिली असेल आणि जर आपण त्या मार्कावर प्रवेश मिळवू इच्छित असाल तर आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे. तो अर्ज आणि त्याच्या फिज् (सुमारे रु. ९०० ते १०००) ड्राफ्ट रुपाने आपल्याला डीटीईला पाठवायचा आहे.
२. आपल्याला ए.आर.सी. (अ‍ॅप्लिकेशन रिसीट सेंटर) मध्ये जाऊन कागदपत्रांची छाननी करून घ्यायची आहे. यात मुख्यत्वे दहावी मार्कलिस्ट, बारावी मार्कलिस्ट, बारावीनंतरचे लिव्हिंग सर्टीफिकेट, डोमिसाईल/ राष्ट्रीयत्वाचा दाखला याचा समावेश आहे. याशिवाय कास्ट सर्टीफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट इ. चा समावेश आहे. यासाठी सुमारे ८ ते १० दिवसांची मुदत दिलेली असते.
अशा प्रकारे सुमारे १५ दिवस जातात. ३० जून, नवीन कॉलेजेसना ए.आय.सी.टी.ई.कडून परवानगी मिळण्याचा अखेरचा दिवस. गेल्या वर्षी सुमारे ५० नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी मिळाली. यावर्षी पण २०-३० नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी मिळेल असे ऐकिवात आहे. याची माहिती १ किंवा २ जुलैला वर्तमानापत्रात येईलच. या नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश करून आपल्याला प्रवेशप्रक्रियेचे आणखी एक माहिती पत्रक मिळेल. ऑप्शन्स भरावयाला सुमारे जुलैचा दुसरा आठवडा उजाडेल. आणि तिसऱ्या आठवडय़ात पहिल्या फेरीचा निकाल अर्थात अलॉटमेंट कळेल.
थोडक्यात म्हणजे रिझल्ट ते ऑप्शन्स हा काळ २१ ते २४ दिवसांचा आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करता येईल. त्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.
कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा? ४ वर्षानंतर कोणत्या शाखेचे महत्त्व वाढेल?
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान शाखांना परत महत्त्वाचे स्थान मिळेल का?
कोणते अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वात चांगले आहे?
अभियांत्रिकी महाविद्यालयाला ग्रेड असण्यामुळे काय फरक पडतो?
कॅम्पस प्लेसमेंटवर अभियांत्रिकी महाविद्यालय निवडावे का?
एकूण शिकवणारे शिक्षक कुठे चांगले आहेत?
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निकालाकडे पाहून प्रवेश घ्यावा का?
नोकरी मिळताना कॉलेजच्या नावामुळे फरक पडतो का?
साधारण फीज किती असतात? ४ वर्षात किती खर्च होतो?
नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे फायदे आणि तोटे?
ऑप्शन फॉर्म कसा भरावा?
हे आणि असे अनेक प्रश्न पालकांना भंडावून सोडत असतात. त्यांची समर्पक उत्तरं देणं आणि प्रत्येकाला आपापला मार्ग शोधायला मदत करणं हाच या सगळ्याचा मूळ हेतू आहे.
किती जागा असतात?
प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रत्येक शाखेमध्ये ३० टक्के जागा विद्यापीठ सोडून इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात व उरलेल्या ७० टक्के जागा या त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी असतात.
या अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वत:च्या महाविद्यालयातील प्रवेश स्वत: देण्याची मुभा आहे आणि त्यासाठी त्यांना २० टक्के जागा दिल्या गेल्या.
१५ टक्के जागा या ए.आय.ई.ई.ई.च्या गुणांवर भरल्या जातात.
एकूण २२२ अभियांत्रिकी महाविद्यालये आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकी २१६ अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी हे नियम आहेत म्हणजेच या प्रक्रियेतूनच प्रवेश होणार आहेत.
प्रश्न. अभय केशव अभ्यंकर
www.trialallotment.com