Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

लाल किल्ला

संगमांना काय मिळाले - पवारांसोबत जाऊन?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी लोकसभा अध्यक्ष पूर्णो संगमा यांच्या दृष्टीने यंदाची दिवाळी महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिवाळीच्या झगमगाटात उजळून निघेल की दिवाळखोरीच्या अंधारात ढकलली जाईल हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असेल. सोनिया गांधींची माफी मागून आणि पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींचे समर्थन करूनही काँग्रेसचा मोह टाळणारे संगमाही दिवाळीची प्रतीक्षा करतील. पवारांच्या नादी लागून आपल्याला काय मिळाले, हा प्रश्न संगमांना अस्वस्थ करीत असेल. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात काम करताना देशासाठी काही तरी चांगले करण्याची जिद्द असलेला नेता असा लौकिक संगमांनी कमावला होता. नरसिंह राव सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांचे महत्त्व देशभरातील कामगार संघटनांच्या गळी

 

उतरविण्याचे अवघड आव्हान कामगार मंत्री म्हणून संगमांनी समर्थपणे पेलले होते. काँग्रेस पक्षात एक वजनदार, समजूतदार नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात नेहमीच दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या ईशान्येकडील राज्यांचा आवाज संगमांच्या माध्यमातून बुलंद होत होता. बुद्धिमान आणि अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि प्रश्नमाणिक, निरागस आणि विनम्र, हसतमुख आणि हजरजबाबी, निष्पक्ष आणि पारदर्शी अशा अनेक सकारात्मक पैलूंचा संगम असलेल्या संगमांना दिल्लीतील २० वर्षाच्या कर्तृत्वाचे फळ लोकसभेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड होऊन मिळाले होते. लोकसभेच्या इतिहासात प्रथमच विरोधी आघाडीच्या नेत्याची बिनविरोध निवड झाली. संगमांच्या पक्षातीत लोकप्रियतेला मिळालेली ही पावती होती. सोनिया गांधींनी पक्षाची सूत्रे हाती घेतली तेव्हा या प्रतिमेच्या जोरावरच त्यांच्या विश्वासू वर्तुळात संगमांना सहज शिरता आले होते. पण उज्ज्वल भवितव्य असलेल्या या नेत्याच्या कारकीर्दीला अचानक ग्रहण लागले. अ. भा. कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांनी संगमांना व्यक्तिगत कारणावरून सर्वादेखत हटकले आणि तेव्हापासूनच त्यांच्या मनात सोनियांविषयी कमालीची अढी निर्माण झाल्याचे म्हटले जाते. मनात खदखदत असलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संगमा निमित्ताच्या शोधात होतेच. बाराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवूनही काँग्रेसश्रेष्ठी पवारांकडे संशयानेच बघत होते आणि पवारही या संशयाला खतपाणी घालून आपले उपद्रवमूल्य वाढवत होते. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झालेले सीताराम केसरी यांचे राजकीय सचिव तारीक अन्वर सोनियांच्या दरबारात आपले अस्तित्व गमावून बसल्यामुळे अस्वस्थ झाले होते. तेराव्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवार होऊ पाहणाऱ्या सोनियांना अपशकुन घडविण्यासाठी पवारांनी विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा संगमा आणि अन्वर यांनी त्यांच्यासोबत डोळे मिटून राजकीय खाईत उडी मारली. पण पवारांनी आपल्या पाठीला पॅराशूट बांधले होते, हे संगमा आणि अन्वर यांच्या सहा-सात महिन्यांनी लक्षात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. आपली लोकप्रियता आणि जनाधाराविषयी अवास्तव कल्पना असलेल्या राजेश पायलट यांनीही या धाडसी मोहिमेत सामील होण्याचे ठरविले. पण अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पवार, संगमा, अन्वर अल्पमतात असल्याचे पाहून पायलट यांनी ऐनवेळी विदेशी वंशाची तलवार म्यान केल्याचे म्हटले जाते. विदेशी वंशाच्या मुद्यावरून संगमा यांनी सोनियांना विरोध करावा, याचा त्यावेळी अनेकांना धक्का बसला. खरे तर संगमांच्या सोनियाविरोधाचे कारण तात्कालिक होते आणि त्याचा विदेशी वंशाच्या मुद्याशी तसा काही संबंध नव्हता. पण सोनियांनी केलेल्या जाहीर अपमानाबद्दल त्यांना धडा शिकविण्याच्या नादात, भावनेच्या भरात आणि पवार यांच्या बहकाव्यात येऊन संगमांनी आपली राजकीय पुण्याई पणाला लावली. पवारांनी मात्र, संधीसाधूपणाला राजकीय चातुर्याचा मुलामा देत ऑक्टोबर १९९९ मध्ये महाराष्ट्रात आणि जानेवारी २००४ मध्ये दिल्लीत सोनियांशी सत्तेसाठी तह करताना विदेशी वंशाचा मुद्दा गुंडाळून ठेवला. पण तत्त्वनिष्ठ व प्रश्नमाणिक संगमांना पवारांप्रमाणे आपलेच शब्द गिळण्याचे ‘राजकीय कौशल्य’ दाखविता आले नाही. त्यांनी सोनियांशी हातमिळवणी केल्याबद्दल पवारांविरुद्ध दंड थोपटले आणि संतापाच्या भरात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून २००४ ची लोकसभा निवडणूक लढविली. एकाकी पडल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीत सामील होऊन त्यांनी नाइलाजाने ‘मुख्य प्रवाहा’त प्रवेश केला. पवारांचे सहकारी महाराष्ट्रात दहा वर्षे सत्तासुखात लोळत असताना संगमांना मेघालयात काँग्रेसच्या विरोधात सतत सत्तेसाठी संघर्ष करणे भाग पडले. मनमोहन सिंग मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे सदस्य असूनही मेघालयात राष्ट्रपती राजवट लागू केली जात असताना पवारांनी मौन बाळगले होते. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी संगमांना भाजपशी हातमिळवणी करावी लागली. राजकारणात दुर्मिळ असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या संगमांनी पवारांच्या संगतीत सतत नकारात्मक राजकारण करून आपली पीछेहाट ओढवून घेतली. एकीकडे आपल्या राजकारणाची माती करून घेणाऱ्या संगमांची विश्वासार्हता ढासळत चालली होती, तर मातीतून सोने उगविणाऱ्या कृषी खात्याच्या माध्यमातून पवार यांचे राजकरण बहरत होते. अल्पसंख्यकांचे मोठे नेते असूनही तारीक अन्वर यांची पवारांच्या मागे फरफट सुरू होती. काँग्रेसमध्ये आज महत्त्वाच्या पदांवर असलेल्या मुस्लिम नेत्यांपेक्षा आपल्याला निश्चितच मानाचे स्थान मिळाले असते, अशी खंत अडगळीत पडलेल्या अन्वर यांनाही वाटत असेल. बिहारच्या कटिहार मतदारसंघात अन्वर यांना सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शर्यतीत ठेवण्यात काँग्रेसने मदत केली होती. विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून पवारांनी सोनिया आणि सोनियांच्या विरोधकांकडून राजकीय लाभ पदरी पाडून घेत असताना या विरोधाची किंमत राजकीय अज्ञातवासात ढकलल्या गेलेल्या संगमा आणि अन्वर यांना चुकवावी लागली. पवार यांच्या दुटप्पी राजकारणाचा दुसरा पैलू प्रखरपणे पुढे रेटताना संगमा यांनी अगदी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्याच्या आदल्या दिवसापर्यंत काँग्रेस व सोनिया-विरोधाची तीव्रता कायम राखली होती. केंद्रात तिसऱ्या आघाडीचे सरकार येईल आणि पंतप्रधान म्हणून आपल्यालाच संधी मिळेल अशी हवा पवारांनी निर्माण केली होती आणि संगमाही त्याच हवेत तरंगत होते. पण झाले उलटेच. पवारांचे दिल्लीतील राजकीय अंदाज सलग दुसऱ्यांदा सपशेल चुकले. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची महायुती करण्याचा निर्णय जवळजवळ पक्का केला होता. यंदाही भुवनेश्वरमध्ये तिसऱ्या आघाडीच्या व्यासपीठावर जाण्याची तयारी झाल्यावर काँग्रेसने इशारा दिल्यानंतर पवारांच्या विमानात नाशिकमधून उडण्याची इच्छाशक्ती उरली नाही. २००४ आणि २००९ साली राजकीय हवामानाचा पवारांसारख्या तरबेज नेत्याला अंदाज येऊ शकला नाही आणि दोन्ही वेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे त्यांच्या वाटय़ाला केंद्रातील सत्ता आली. संगमांच्या हाती मात्र काहीही लागले नाही. पवारांच्या भरीस पडून संगमांनी सोनियांना विरोध केला नसता तर आज मेघालय खिशात ठेवून काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ते दिल्लीत आपला दबदबा वाढवू शकले असते. पवारांच्या वरचे आणि प्रणव मुखर्जींच्या खालोखाल ए. के. अँटनीच्या बरोबरीचे स्थान त्यांना काँग्रेस पक्षात लाभले असते. १८ वर्षापूर्वी मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणांचे कामगार जगतात मार्केटिंग करणाऱ्या संगमांना त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची पाच वर्षापूर्वी संधी मिळाली असती. मेघालयात त्यांचे पुत्र व कन्या राजकारणात कधीचेच प्रस्थापित झाले असते. केंद्रीय मंत्रिमंडळात काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या मुलांना आपसूक संधी मिळत असताना पवारांच्या वशिल्याने कन्या अगाथाच्या पदरी राज्यमंत्रीपद पाडून घेण्यासाठी तडजोड करण्याची वेळ आली नसती. सचोटी बाळगणाऱ्या व्यक्तीने व्यवसायाप्रमाणेच राजकारणातही भागीदारी करण्याचा मोह टाळला पाहिजे, हा धडा संगमांच्या दहा वर्षाच्या राजकीय प्रवासाने घालून दिला आहे. काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसबाहेर राहताना तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या संगमा यांनी ज्या खुल्या दिलाने सोनियांची माफी मागितली ते त्यांच्या पारदर्शी आचरणाला साजेसेच आहे. चूक उमगल्यानंतर ती जाहीरपणे मान्य करण्याची संगमांसारखी दिलदार वृत्ती पवारच काय कित्येक बडय़ा राजकीय नेत्यांनाही दाखविता येणार नाही. आज संगमा ६२ वर्षाचे आहे. दहा वर्षाची राजकीय पीछेहाट पचवून त्यांना आणखी दहा वर्षे पूर्वीच्या सचोटीने आणि उमेदीने राजकारण करणे शक्य आहे. ईशान्येकडील राज्यांची व नेत्यांची होत असलेली उपेक्षा बघता त्यांना खऱ्या मुख्य प्रवाहात येणे भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याचे संगमा म्हणत असले तरी आता मुख्य प्रवाहातून हा पक्ष हळूहळू काठाच्या दिशेने सरकत चालला आहे. दहा वर्षापूर्वीचा विदेशी वंशाचा मुद्दाही संपला आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या अकल्पित घरसगुंडीनंतर आता पवारांचा जोमही संपू लागला आहे. पवारांचे उत्तराधिकारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळण्यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार किंवा पवारांच्या राजकारणाला आदर्श मानणारे त्यांचे विश्वासू तरुण सहकारी पवारांच्या वतीने राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाची भूमिका बजावू शकतील काय याची चर्चा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतरच सुरू होईल. गेली दहा वर्षे दिवसाचे चोवीस तास राजकारण करून काय साधले याचा ताळेबंद पवारांनाही यंदा दिवाळीत मांडावाच लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता नशिबाने पुन्हा आली तरी पवारांची दिल्लीत घटलेली ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढण्याची शक्यता नाही. राष्ट्रवादीच्या साऱ्या पळवाटा रोखून नाकेबंदी करण्याची चोख व्यवस्थाच लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी करून ठेवली आहे. विधानसभेच्या जागावाटपापासून ते सत्तेत आल्यावर महत्त्वाच्या खातेवाटपापर्यंत सर्वच बाबतीत काँग्रेसचे वर्चस्व राष्ट्रवादीला मुकाटय़ाने सहन करावे लागेल किंवा आपले राजकीय अस्तित्व शाबूत राखण्यासाठी तीन वर्षापूर्वी बंगलोरमध्ये देवेगौडांच्या आशीर्वादाने कुमारस्वामींनी केलेल्या ट्वेंटी-२० च्या प्रयोगाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुनरावृत्ती करावी लागेल.
काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंग बांधणारे पवार दिल्लीत फसलेला प्रयोग मुंबई करून राज्यात वेगळी चूल मांडून केंद्रातील आपले मंत्रिपद शाबूत राखण्याची कसरत करू शकतात. त्यात आपली भूमिका कोणती असेल याचा संगमांना विचार करावा लागेल. दिवाळीची प्रतीक्षा त्यांनाही असेल.
सुनील चावके