Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

शरद पवारांची सशर्त माफी मागण्यास तयार -शालिनीताई
सातारा, ७ जून/प्रतिनिधी

शरद पवार यांची आपण काही अटींवर माफी मागण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झाले गेले विसरून जावे. मनात अढी न धरता निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती लेखी पत्राद्वारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना केली असल्याचे आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वसंतदादा कारखान्यातील समस्यांवर मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांवर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार दि. ९ जून रोजी मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राज्य साखर कामगार मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी दिला आहे.

तीस कोटींच्या तरतुदीमुळे माढय़ात सिंचन कामांना गती
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी

शासनाने अर्थसंकल्पात सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या कामासाठी तीस कोटींची तरतूद केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या योजनेला गती मिळून या भागातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल, असा दावा आमदार बबनराव शिंदे यांनी केला आहे. सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या कामांसाठी अद्यापही १५० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

लोकाभिमुख निर्णयामुळे केंद्रात पुन्हा सत्ता- पृथ्वीराज चव्हाण
कराड, ७ जून/वार्ताहर

डॉ. मनमोहन सिंग सरकारने गेल्या पाच वर्षांत घेतलेले लोकाभिमुख निर्णय आणि जनतेच्या दारिद्रय़ निर्मूलनासाठी झालेला कसोशीचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत फायद्याचा ठरला आणि काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे यश प्राप्त झाल्याचे मत काँग्रेसचे महासचिव व पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेसंदर्भात आपण अनभिज्ञ असून ही बाब पक्षश्रेष्ठींशी निगडित असल्याचे ते म्हणाले.

निधीचे समान वाटप न झाल्याने नगरसेवकांवर अन्याय
सांगलीतील काँग्रेस नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा
सांगली, ७ जून / प्रतिनिधी
शासकीय अनुदानातील अडीच कोटी रुपयांच्या निधीचे समान वाटप न करता सांगली महापालिकेतील सत्ताधारी विकास महाआघाडीने ४० टक्के नगरसेवकांवर अन्याय केला आहे. या निधीचे येत्या दोन ते तीन दिवसांत समन्यायी वाटप न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विरोधी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण नवलाई व बाळाराम जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

बलुतेदारांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्र्यांचाच खोडा
राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षांचा आरोप
सांगली, ७ जून / प्रतिनिधी
बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीस मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच जाणीवपूर्वक खोडा घातला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला. बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाविरोधात लवकरच ‘बोंबाबोंब’ आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आटपाडीत गारांसह जोरदार पाऊस
आटपाडी, ७ जून/वार्ताहर

तालुक्यात शनिवारी सायंकाळी खरसुंडी येथे वादळी वारे व गारांसह जोरदार पाऊस झाला तर आटपाडी व शेटफळे येथे हलक्या ते मध्यम तर दिघंचीत रिमझिम पावसाने हजेरी लावली. खरसुंडी येथे सायंकाळी ६ ते ७ दरम्यान वादळी वारे व गारांसह पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. कापसाची पाण्याखाली गेली आहेत. खरसुंडी परिसरातील ताली, बांध फुटले असून ओढय़ानाल्यांना पूर आला असून अचानक कोसळलेल्या या पावसाने बहुतांश ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.आटपाडी शहरात व परिसरात सकाळपासून उष्मा जाणवत होता. दुपारी ४ ते ५ दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली तर रात्री ७.३० पर्यंत रिमझिम सुरू होती. शेटफळे भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दिघंची भागात दुपारनंतर रिमझिम सुरूच होती.

बेळकी दारूमुक्तीचा ग्रामस्थांचा निर्धार
मिरज, ७ जून / वार्ताहर

मिरज तालुक्यातील बेळंकी येथे दारूबंदीसाठी महिला जनजागृती अभियान राबविले जात आहे. या अभियानात गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचतगट व राजकीय गट यांनी एकत्र येऊन बेळंकी दारूमुक्त व व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला आहे.बेळंकी येथील नागरिक, महिला, तरुण व सर्व राजकीय गटातील कार्यकर्ते दि. ३१ मे पासून रोज सायंकाळी प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन दारूबंदीची जनजागृती करून व्यसनमुक्त गाव बनवून उभी बाटली आडवी करण्याचा सल्ला जनजागृती फेरीद्वारे देत आहेत. या फेरीनंतर महिला मंडळाची बैठक घेऊन दारूमुळे कसे संसार उद्ध्वस्त होतात, याचे बोलके मनोगत लहान मुले-मुली व महिला यात व्यक्त करतात.

इंडिका-कंटेनरची धडक; पुण्यातील एक ठार, तिघे जखमी
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी

पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या एका इंडिका कारला कंटेनरची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात एकजण ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. यातील मयत व जखमी हे पुण्यातील कोंढवा भागात राहणारे आहेत. हा अपघात रविवारी दुपारी १२.४५ वाजता झाला. या अपघातात रफिक युसूफ शेख (वय ४०, रा. कमलदीप गार्डन, कोंढवा) हा जागीच ठार झाला, तर कारमधील फारूख मजिद मनियार (वय ३५), अल्ताफ इब्राहिम सिद्दिकी (वय ४२) व युसूफ सुलेमान शेख (वय ३४) हे अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील सर्व जखमीही कोंढव्यातच राहणारे आहेत. पुणे रस्त्यावर सोलापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केगाव येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर पुण्याहून सोलापूरकडे निघालेली इंडिका (एमएच १२-८९२६) कार एका मोटारीस ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकली. त्यात एकजण जागीच मरण पावला. याबाबत चौकशी फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.

नागरिकांच्या प्रश्नांसाठी सेनास्टाईल आंदोलन करणार : अ‍ॅड. बाबर
सातारा, ७ जून/प्रतिनिधी
जनतेच्या प्रश्नावर शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.खासदार उदयनराजे भोसले यांचे एकेकाळचे निष्ठावान सहकारी सातारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष यांची जिल्हाप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केल्यानंतर प्रथमच त्यांनी आपली भूमिका विशद करून सांगितले की, सर्व घटकांना सामावून घेऊन काम करण्यास आपले प्राधान्य राहील. शेतकऱ्यांचे प्रश्न, भारनियमन, पाणी, कृष्णाखोरे प्रकल्प हे प्रश्न हाती घेऊन विरोधी पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यात येईल. प्रेमाने जग जिंकता येते, यावर आपला विश्वास आहे. माजी जिल्हाप्रमुख दीपक पवार व नरेंद्र पाटील हे आपले मित्रच आहेत.दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अ‍ॅड. बाबर यांचा नामोल्लेख टाळून स्वार्थापोटी दुसऱ्याच्या वळचणीला जाणाऱ्यांच्या मुसक्या आवळू, असा इशारा दिला आहे.

सोलापुरात तरणतलावात पोहताना मुलाचा मृत्यू
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी
सोलापूर महापालिकेच्या मरकडेय तरणतलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षांच्या मुलाचा पाण्यात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली.स्वप्नील राजकुमार गर्जे (रा. रविवार पेठ) असे दुर्दैवी मृत मुलाचे नाव आहे. तो आपल्या भावासोबत या तरणतलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे पोहणाऱ्यांची संख्या जास्त होती. स्वप्नील हा पत्र्याचा डबा कंबरेला बांधून पाण्यात उतरला. परंतु थोडय़ाच वेळात तो पाण्यात बुडू लागल्याने जीवरक्षक चैतन्य शिंदे यांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी तो बेशुध्दा-वस्थेत होता. त्यास उपचारासाठी दवाखान्या नेले असता उपचारापूर्वीच तो मरण पावला. कंबरेला बांधलेला पत्र्याचा डबा सुरक्षित नसल्यामुळे स्वप्नीलचा बळी गेला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे. त्याने दहावीची नुकतीच परीक्षा दिली आहे.

मनसे सोलापूर विधी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. गडदे
सोलापूर, ७ जून / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर शाखेच्या विधी विभागाच्या शहराध्यक्षपदी अ‍ॅड. किरण वळसंगकर तर जिल्हा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. श्रीकांत गडदे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नागरिकांना कायदेविषयक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनसेने विधी विभाग कार्यान्वित केला आहे. या विभागाचे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदाही अ‍ॅड. अरविंद अंदोरे हे सांभाळत आहेत. त्यांनी हे कार्य व्यापक होण्यासाठी अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. जिल्हा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. श्रीकांत गडदे तर शहराध्यक्षपदी अ‍ॅड. किरण वळसंगकर यांची नेमणूक झाली. तर जिल्हा सरचिटणीसपदी अ‍ॅड. आसीफ शेख, शहर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सदानंद माने आणि अ‍ॅड. अशोक तुपडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अ‍ॅड. अंदोरे यांनी जाहीर केले.

पंचगंगा कारखान्याची दुसरी उचल १०० रुपये
इचलकरंजी, ७ जून / वार्ताहर
येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गत हंगामात गाळपास आलेल्या उसापोटी दुसरा अ‍ॅडव्हान्स रूपये शंभर प्रमाणे ४ जून रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संबंधित शाखेतील व इतर बँकांच्या खात्यावर ऊस पुरवठादार सभासद व बिगर सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. संबंधितांनी बँकांशी संपर्क साधून बिले घ्यावीत, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले आहे.पाटील म्हणाले, यापूर्वी टनाला रूपये १२०० प्रमाणे अ‍ॅडव्हान्स अदा केला असून या दुसऱ्या अ‍ॅडव्हान्समुळे प्रतिटनाला १३०० रूपये इतका ऊस बिल अ‍ॅडव्हान्स दिला आहे. ऊस बिलाची रक्कम हंगाम २००८-०९ या हंगामातील इतर कारखान्याच्या बरोबरीने देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.

जयश्री पाटील यांना सेवाभूषण पुरस्कार प्रदान
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

ग्रामीण भाषेतील जात्यावरील ओव्या, उखाणे व पाळणे या ग्रामीण लोकसाहित्याची स्वयंरचना करून विविध व्याख्यानांद्वारे ते ग्रामीण भागात पोहोचवून स्वत:ची वक्तृत्वशैली निर्माण करणाऱ्या येथील कविभूषण डॉ. श्रीमती जयश्री श्रेणिक पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सेवाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात नाशिकचे जिल्हाधिकारी एस. वेलुरासू यांच्या हस्ते डॉ. जयश्री पाटील यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. जयश्री पाटील यांना यापूर्वी अमेरिकेचा हिंदी साहित्य गौरव पुरस्कार व लंडन येथील बहुभाषिक साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच अमेरिका व इंग्लड येथील भारतीय राजदूतावासात विशेष सुवर्णपदकानेही सन्मानित केले आहे. या कार्यक्रमावेळी आमदार दिलीप बनकर, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास कोळेकर, मानसिंग बँकेचे जे. के. बापू जाधव, कुमार गायकवाड, नाशिकचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. साळशिंगीकर व उद्योगपती माधवराव भिडे आदी उपस्थित होते.

बेघरांचा नायब तहसीलदारांना घेराओ
इचलकरंजी, ७ जुन / वार्ताहर
हुपरी इथल्या बेघरांसाठी गावठाण वाढ करून प्लॉटचे वाटप करावे यासह अन्य मागण्यांसाठी गावचावडीवर मोर्चा काढून सुमारे ६ तास घेराओ घातला. नायब तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या दलित, बौध्द, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, चांदी कामगार, छोटे व्यावसायिक, ओबीसी आणि सर्वच जाती धर्मातील बेघर लोकांसाठी शासनाने गावठाण वाढ करून त्यांना प्लॉटचे वाटप करावे, वाळवेकरनगर, संभाजी मानेनगर या दोन झोपडपट्टीत ४०० गरीब कुटुंब राहत आहेत. या दोन्ही झोपडपट्टीत अनेक जाती-धर्माचे लोक गेल्या २० वर्षांपासून राहत असल्याने त्यांचे अतिक्रमण कायम करावे यांसह अन्य मागण्यांसाठी राजीव गांधी श्रमिक बेघर संघटनेच्यावतीने नेमिनाथ वाळवेकर, मंगलराव माळगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

दलित साहित्य अकादमीचा गणेश शितोळे यांना पुरस्कार
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी
भुसावळच्या महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील अण्णा भाऊ साठे सन्मान पुरस्कार सोलापूर जिल्हा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष संदीप ऊर्फ गणेश पांडुरंग शितोळे यांना जाहीर झाला आहे. भुसावळ येथे झालेल्या फुले-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलनात शितोळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. शितोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, वंचित आणि निराधारांसाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

ट्रकखाली वृद्ध ठार
शाहूवाडी, ७जून / वार्ताहर
ट्रक मागे घेत असताना ट्रकच्या मागेच उभ्या असलेल्या निवृत्ती तुकाराम निकम (वय ६५) या वृध्दाच्या अंगावरून ट्रकची चाके गेल्याने हा वृध्द चाकाखाली चिरडून ठार झाला. हा अपघात तालुक्यातील डोणोली या गावी घडला. रत्नागिरीहून बांधकामासाठी चिरा दगड घेवून हा ट्रक डोणोली येथे आला होता.

सोलापुरात पावसामुळे नागरिक सुखावले
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी

वाढता उष्मा सहन करीत मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या सोलापूरकरांना शनिवारी सायंकाळी पावसाने सुखद दिलासा मिळाला. हा मान्सूनचा पाऊस नसला तरी त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शनिवारी दिवसभर उष्म्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले होते. लग्नसराईतच हा उकाडा अंगाची लाही लाही करणारा ठरला असतानाच दुपारनंतर वातावरणात बदल होऊन आकाशात ढग दाटून आले आणि त्यापाठोपाठ पावसाला प्रारंभ झाला. ढगांच्या गडगडासह पडलेल्या या पावसाने सारेजण सुखावले असल्याचे दिसून आले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.

मीरा शहा यांचे निधन
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

सांगली येथील प्रसिध्द उद्योजक भावेश शहा यांच्या पत्नी मीरा (वय ३९) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. पुण्याचे माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांच्या मीरा या कन्या होत. गेले महिनाभर त्या पुणे येथेच वास्तव्यास होत्या. संगणक क्षेत्रातील प्रख्यात व्ही. जी. कॉम्प्युटर्सच्या त्या संचालिकाही होत्या. त्यांच्या पश्चात पती भावेश, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.