Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शरद पवारांची सशर्त माफी मागण्यास तयार -शालिनीताई
सातारा, ७ जून/प्रतिनिधी

 

शरद पवार यांची आपण काही अटींवर माफी मागण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झाले गेले विसरून जावे. मनात अढी न धरता निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती लेखी पत्राद्वारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांना केली असल्याचे आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादीतून आपण निलंबित असलो तरी तांत्रिकदृष्टय़ा राष्ट्रवादीतच असल्याने विधीमंडळ अधिवेशन काळात पक्षाची पत्रे व आदेश अजूनही येत असून, राष्ट्रवादीच्या खुर्चीतच बसावे लागत आहे. शरद पवार यांच्यावर आपण केलेली टीका वस्तुस्थितीस धरूनच होती, याचा पुनरुच्चार करून त्यांनी सांगितले की, आपल्यावरही राष्ट्रवादीने टीका केली. ही कटुता विसरण्याची आपली तयारी आहे. देशातील जनतेला किडका गहू पुन्हा देणार नाही व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचे काम कृषीमंत्री या नात्याने करण्याची ग्वाही शरद पवार यांनी दिल्यास त्यांची आपण माफी जरूर मागू. पक्षावर व त्यांच्यावर टीका करणाऱ्या इतर व्यक्तींचे निलंबन मागे घेतले, मग आपल्यालाच वेगळा न्याय का असा सवाल करून शालिनीताईंनी राष्ट्रवादीने निलंबन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे.
यशवंतभाऊ भोसलेंना नोटीस
सातारा जिल्हा विकास परिषदेचे यशवंतभाऊ भोसले यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत आपल्यावर केलेले आरोप निराधार असून, त्यांच्यावर बदनामीचा फौजदारी व दिवाणी कारवाई करण्यात येणार असून, त्याबाबतची नोटीस वकीलामार्फत पाठविली असल्याचे शालिनीताई यांनी या वेळी सांगितले. यशवंतभाऊ भोसले यांनी कोरेगाव येथे झालेल्या मेळाव्यात ‘ताईने गायरान खाल्ले, जरंडेश्वर खाल्ला, भंगार विकून मिजास मारली, रुबाब दाखवला, जरंडेश्वरचे थडगे बनविले’ अशा स्वरुपाची अनेक बदनामीकारक विधाने करून आपली बदनामी केली आहे.
किसनवीरचे टेंडर
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु व्हावा यासाठी संचालक मंडळाने नियोजन केले असून, विशेष सभा घेतली. त्यामध्ये संचालक मंडळाच्या खालील प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी दरवर्षी तीन कोटी भाडे कारखान्यास मिळावे, आसपासच्या कारखान्या इतपत ऊसदर सभासदांना मिळाला पाहिजे, कामगारांना प्रतिवर्षी वेतनवाढ, बोनस मिळावा, सध्याच्या सर्व कामगारांना नवीन प्रशासनाने सामावून घ्यावे, भुईंज येथील किसनवीर कारखान्याने भरलेले टेंडर कमी दराचे आहे ते दुरुस्त करुन देण्याची गरज असल्याचे शालिनीताई यांनी सांगितले. भुईंजच्या एकमेव टेंडरवर पुढील आठवडय़ात निर्णय होईल, किसनरवीर भाडेपट्टा करार, ऊसदर, कामगारांचे पगार व इतरबाबत प्रसंगी तडजोड करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.