Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वसंतदादा कारखान्यातील समस्यांवर मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

 

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांवर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार दि. ९ जून रोजी मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राज्य साखर कामगार मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी दिला आहे.
वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यातील कामगारांची थकीत देणी द्यावीत व साखर कारखाना कार्यक्षमतेने चालवावा अथवा तो भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी साखर कामगारांच्या वतीने गेले पाच दिवस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या कामगारांना मार्गदर्शन करताना बी. आर. पाटील बोलत होते. या आंदोलनाचे नेतृत्व साखर कामगार युनियनचे सरचिटणीस आर. बी. शिंदे व अध्यक्ष एस. टी. देसाई हे करीत आहेत.
वसंतदादा पाटील यांच्या निष्क्रिय वारसांच्या अनागोंदी कारभारामुळे वसंतदादांच्या नावाला काळिमा फासला गेला आहे. केवळ कामगारांमुळेच हा साखर कारखाना वाचला आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी सग्यासोयऱ्यांचे भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचे काम केले आहे. वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही बी. आर. पाटील यांनी दिला.
दरम्यान, वसंतदादा साखर कामगारांच्या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कामगार संघटनांसह सांगली जिल्हय़ातील सुमारे ३०हून अधिक कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात भाग घेतला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला, तर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रा. बाळासाहेब हाक्के व माजी खासदार हिंदकेसरी मारुती माने यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा व्यक्त केला.