Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तीस कोटींच्या तरतुदीमुळे माढय़ात सिंचन कामांना गती
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी

 

शासनाने अर्थसंकल्पात सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या कामासाठी तीस कोटींची तरतूद केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या योजनेला गती मिळून या भागातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल, असा दावा आमदार बबनराव शिंदे यांनी केला आहे. सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेच्या कामांसाठी अद्यापही १५० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे ८० कोटींच्या तरतुदीची मागणी जलसंपदामंत्री अजित पवार, पाटबंधारेमंत्री रामराजे नाईक निंबाळकर, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आपण निवेदनाद्वारे करून त्यासाठी आग्रहही धरला होता. गेल्या गुरुवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ३० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनुशेषाचा मुद्दा उपस्थित होत असल्यामुळे या योजनेसाठी निधीची तरतूद होत नव्हती. आता अनुशेषाचा मुद्दा संपल्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता या निधीतून माढय़ाकडे जाणारा मुख्य कालव्याच्या व मोडनिंब वितरिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या योजनेमुळे सध्या सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या तरतूद करण्यात निधीतून होणाऱ्या कामामुळे मोडनिंब माढा उजवा कालवा मिळून सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रास पाणी मिळेल, असेही शिंदे यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार निवडून आल्यामुळे या मतदारसंघातील सिंचनासह अन्य कामांना गती मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.