Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

लोकाभिमुख निर्णयामुळे केंद्रात पुन्हा सत्ता- पृथ्वीराज चव्हाण
कराड, ७ जून/वार्ताहर

 

डॉ. मनमोहन सिंग सरकारने गेल्या पाच वर्षांत घेतलेले लोकाभिमुख निर्णय आणि जनतेच्या दारिद्रय़ निर्मूलनासाठी झालेला कसोशीचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत फायद्याचा ठरला आणि काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठे यश प्राप्त झाल्याचे मत काँग्रेसचे महासचिव व पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेसंदर्भात आपण अनभिज्ञ असून ही बाब पक्षश्रेष्ठींशी निगडित असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाल्यानंतर कर्मभूमी कराड येथे आलेले पृथ्वीराज चव्हाण आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, मनोहर शिंदे यांची या वेळी उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राला भरपूर मंत्रिपदे मिळाली म्हणणे चुकीचे असल्याचे नमूद करून तुलनेत मिळालेली मंत्रिपदे योग्यच असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भरपूर मंत्रिपदे म्हणून भरपूर कामे ही बाबही गैर असून, महाराष्ट्र हे निश्चितच महत्त्वाचे राज्य आहे. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत इथे भरपूर काही केले आहे. म्हणूनच महाराष्ट्रही काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीने गेल्या पाच वर्षांतील आपल्या कारकीर्दीमध्ये शहरी व ग्रामीण भागासाठी विविध योजना राबवल्या. महिला, कष्टकरी, शेतकरी यांसह सर्वच अपेक्षित वर्गासाठी ताकदीत लोकाभिमुख निर्णय घेतले. लोकांच्या दारिद्रय़ निर्मूलनासाठी आमच्याकडून झालेला कसोशीचा प्रयत्न आदी कारणांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाल्याचा विश्वास त्यांनी दिला.
आमच्याकडे जबाबदारी असलेल्या राज्यात काँग्रेसला भरघोस यश मिळते. या रहस्याबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्ष हा प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे. डॉ. मनमोहन सिंग सरकारने योग्य, अचूक असे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. या सरकारने दारिद्रय़ निर्मूलनाचे कार्य साधले आणि ज्या राज्यांची माझ्याकडे जबाबदारी होती तेथे मी पक्षहित आणि जनहित साध्य करण्याचा प्रयत्न केल्यानेच काँग्रेसला या राज्यात मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
देशात अनेक घोटाळे होत आहेत. या संदर्भात त्यांना विचारले असता, राज्य सरकार व न्यायालयाने अशा प्रकरणांचा तपास केंद्राकडे सुपूर्द केल्याशिवाय आम्ही काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
पवनराजे नाईक निंबाळकर यांच्या खूनप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या तपासासंदर्भात आपण समाधानी आहात का, या प्रश्नावर त्यांनी सीबीआयचा अहवालच आला नसल्याने या प्रकरणी भाष्य करणे उचित नसल्याचे स्पष्ट केले.
निर्गुतवणुकीच्या केंद्राच्या धोरणासंदर्भात चव्हाण म्हणाले, की निर्गुतवणुकीला डाव्यांचा विरोध आहे, तर भाजप सरकारच्या कारकीर्दीत सरसकट अवलंबिलेल्या खासगीकरणाच्या धोरणाला आमचा विरोध आहे. योग्य संधी पाहून केंद्र शासन निधी उभा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपली कर्मभूमी कराडला मोठा चांगला प्रकल्प येण्यात काय अडचण आहे, या प्रश्नावर त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या मोठय़ा जागेचा प्रश्न कळीचा असल्याचे स्पष्ट केले. अशा मोठय़ा प्रकल्पाच्या जागांना योग्य मोबदला मिळावा, असा केंद्र सरकार कायदाच करत आहे. त्यानंतर कराडनजीक मोठा प्रकल्प उभारण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची उद्दिष्टे लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितच संपुष्टात आली असून, आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा, या विधानाचा पुनरुच्चार करताना, पण हा विचार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच करायचा आहे, असे हसतमुखाने सांगून काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेसंदर्भात आपल्याला काही माहिती नसून, ही बाब पक्षश्रेष्ठींशी निगडित असल्याचा निर्वाळा दिला.
महिला विधेयकासाठी आग्रहीच
महिला विधेयकासाठी काँग्रेस आग्रहीच असून, राष्ट्रपतींच्या भाषणात ही भूमिका विशद आहे. काहींचा महिला विधेयकाला विरोध आहे, पण काँग्रेस महिला विधेयकाचा गांभीर्याने सकारात्मक विचार करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.