Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आषाढी यात्राकाळात वारक ऱ्यांच्या गैरसोयी दूर करणार - मोहिते पाटील
पंढरपूर, ७ जून/वार्ताहर

 

यात्राकाळात वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहून आषाढी यात्रा सुरळीत पार पाडावी, असे यात्रा नियोजन बैठकीत ग्रामविकास तथा पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
आषाढी यात्रा नियोजनाबाबत पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्य़ांतील अधिकारी तसेच महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी, दिंडीप्रमुख यांच्यासमवेत पंढरपूर येथील संत तुकाराम भवन येथे बैठक आयोजित केली होती त्यावेळी मोहिते पाटील बोलत होते.
पंढरपूर, पुणे, पंढरपूर पालखी मार्गावर सासवड येथील अरुंद पूल तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील भंडीशेगाव, वाखरी, तोडलेबोंडले या ठिकाणचे पूल अरुंद असल्याने आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान मोठी गर्दी होऊन अडथळा होतो, रस्ते जाम होतात, त्याचा त्रास वारकऱ्यांना होतो. तो कमी करण्यासाठी हे अरुंद पूल त्याचे रुंदीकरण तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात करुन गैरसोय दूर करण्यात येईल असे मोहिते पाटील यांनी सांगितले.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, पुणे; सातारा जिल्हाधिकारी देशमाने, अप्पर जिल्हाधिकारी एन. जी. मांडुरके, जिल्हाधिकारी जगदीश पाटील, सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील आडकर, ग्रामिण पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे, अतिरिक्त अधीक्षक सुवेज हक, उप पोलीस अधीक्षक प्रमोद होनराव यांच्यासह मंगळवेढा, अकलूज, सातारा येथील व सोलापूर येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते.