Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वीजप्रश्नी शिवसेनेचा शुक्रवारी कोल्हापुरात मोर्चा
कोल्हापूर, ७ जून / विशेष प्रतिनिधी

 

राज्यातील ग्रामीण भागाला सलग १६ तास वीजपुरवठा व्हावा आणि संपूर्ण भारनियमन बंद होईपर्यंत वीजवितरण कंपनीचा दरवाढ प्रस्ताव रद्द करावा या प्रमुख मागण्यांसह विजेविषयीच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने व्यापक जनआंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक १२ जून रोजी कोल्हापुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी येथे दिली.
विजेच्या गंभीर प्रश्नांवर आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी येथील केशवराव भोसले नाटय़गृहात पेंढारकर कलादालनामध्ये सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला असून वीजप्रश्नी उभारण्यात येणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे असे पवार यावेळी म्हणाले. या मेळाव्याला शहरप्रमुख राजेश क्षीरसागर, प्रा.विजय कुलकर्णी, रवी चौगुले, विजय देवणे, अशोक माने, प्रवीण सावंत, बाजीराव पाटील, विश्वनाथ कुंभार, दिलीप देऊसकर, महिला आखाडी प्रमुख शुभांगी साळोखे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सेनेचे सर्व तालुकाप्रमुख उपस्थित होते.
येथील भवानी मंडपातून सकाळी १० वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहतील अशी ग्वाही देताना पवार यांनी शहरातील नागरिकांनी शासनाच्या वीजविषयक धोरणावर असंतोष व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राज्य वीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी जिल्ह्य़ातून १० हजार हरकतींचे प्रस्ताव २९ जूनपूर्वी दाखल करण्यात येणार आहेत. तसेच शेतीचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडीत करू दिला जाणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.