Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रेशन ग्राहक संघटना मोर्चाचा तहसील कचेरीत घुसण्याचा प्रयत्न
इचलकरंजी, ७ जून / वार्ताहर

 

लाल बावटा रेशन ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने इचलकरंजी येथे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. आक्रमक आंदोलक पुरवठा कार्यालयात घुसताना पोलीस आणि त्यांच्यात धुमश्चक्री झाली. तहसीलदार समीर शिंगटे यांनी मागण्यांसदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सर्व रेशन कार्डावर दरमाणशी दरमहा १२ किलो धान्य, गोडे तेल, रॉकेल, रेशन दुकानातून पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी आज इचलकरंजीत लालबावटा रेशन ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सध्याच्या वाढलेल्या महागाईमुळे गोरगरीब, सर्वसामान्य जनता यांना खुल्या बाजारातील धान्य घेऊन संसार चालविणे अत्यंत कठीण झाले आहे. केसरी रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नाही. त्यामुळे सर्वच रेशनकार्ड धारकांना दरमहा माणशी २ किलो धान्य, १ किलो साखर, २ किलो गोडेतेल, २ किलो तूरडाळ मिळाली पाहिजे. तसेच १ सिलिंडर असल्यास ५ लिटर, २ गॅस सिलिंडर असल्यास ३ लिटर रॉकेल मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
लक्ष्मी मार्केटपासून सुरू झालेला मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून पुरवठा कार्यालयावर आल्यानंतर आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले. पोलिसांचे कडे तोडून तसेच कार्यालयाबाहेरील फाटक तोडून आत प्रवेश केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धमुश्चक्री झाली. अखेर कार्यकर्त्यांनी आवारातच जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. सक्षम अधिकारी आल्याशिवाय चर्चा नाही अशी भूमिका कॉ.दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, कॉ.चंद्रकांत यादव यांनी घेतली. अखेर तहसीलदार समीर शिंगटे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून दोन दिवसात जिल्हा पुरवठा कार्यालयात बैठक घेऊन मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.