Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इस्लामपूर नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी
इस्लामपूर, ७ जून / वार्ताहर

 

नगराध्यक्षांच्या कार्यकालाची मुदत पुढील आठवडय़ात संपत आहे. परिणामी नगराध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून इच्छुकांच्या हालचाली गतिमान बनल्या आहेत. तालुक्यातील मुस्लिम समाजाने नगरसेवक पीरअली पुणेकर यांनाच संधी द्यावी, अशी आग्रही मागणी गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्याचा निर्णय येथे झालेल्या मुस्लिम बांधवांच्या मेळाव्यात घेतला आहे.
इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिलांसाठी राखीव होते. ही मुदत येत्या दि. १६ जून रोजी संपते आहे. पुढील अडीच वर्षे ओबीसी पुरूषांसाठी नगराध्यक्षपद राखीव झाले आहे. ओबीसी गटातील नगरसेवक नगराध्यक्षपद मिळावे म्हणून मोर्चेबांधणी करू लागले आहेत.
याच पाश्र्वभूमीवर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक पीरअली पुणेकर यांना गृहमंत्री जयंत पाटील यांनी नगराध्यक्षपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी येथील भारत हॉल येथे शुक्रवारी तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व्यापक मेळावा झाला. या मेळाव्यात पीरअली पुणेकर यांना नगराध्यक्ष करावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज जयंत पाटील यांच्या पाठिशी आजअखेर ठामपणे उभा आहे. या समाजाचा पक्ष म्हणजे गृहमंत्री जयंत पाटील हाच पक्ष असल्याने ते या समाजाला पीरअली पुणेकर यांना नगराध्यक्ष करून न्याय देतील, असा विश्वास माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. गृहमंत्री जयंत पाटील यांना सर्व मुस्लिम संघटनांनी वेगवेगळी निवेदने देऊन पुणेकर यांना नगराध्यक्ष करण्याची मागणी करण्याचा निर्णय या मेळाव्यात करण्यात आला.
सव्वीस सदस्य असलेल्या इस्लामपूर नगरपालिकेत जयंत पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताधारी २१ सदस्य आहेत, तर विरोधी आघाडीचे केवळ पाच नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदाचा निर्णय गृहमंत्री जयंत पाटील यांच्यावरच अवलंबून असल्याने इच्छुक नगरसेवक आपापल्या परीने मोर्चेबांधणी करून नगराध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.