Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मंथन’ने केले तरुणाईला अंतर्मुख
कोल्हापूर, ७ जून / विशेष प्रतिनिधी

 

कलापूर कोल्हापूरच्या सर्जनशील वातावरणात ज्यांनी वयाच्या ६-७ व्या वर्षी पहिली कथा लिहिली अशा विजय तेंडुलकरांना नाटय़ चित्रपट सृष्टीने गमावले म्हणजे नेमके काय गमावले याची जाणीव आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रविवारी तेंडुलकरांना आदरांजली म्हणून प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘मंथन’ या चित्रपटामुळे महोत्सवास उपस्थित तरूणाईला झाली. मंथन या चित्रपटाचे दिग्दर्शन शाम बेनेगल यांचे असले तरी घट्ट वीण असणारी नेटकी पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहे. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांच्यासारखे कलावंत असताना विजय तेंडुलकरांच्या पटकथेसाठी मंथन अधिक लक्षात राहतो हे विशेष !
जिल्हा प्रशासन व कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी यांनी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एनडीटीव्ही ल्युमिएर, संजय घोडावत ग्रुप, पार्वती मल्टिप्लेक्स, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, रत्नाकर बँक, रेडिओ मिर्ची, िहडाल्को, एस.जी.फायटो फार्मा तसेच राज्याचे सांस्कृतिक संचालनालय यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल पार्वती मल्टिप्लेक्स येथे दिनेश भोसले दिग्दर्शित मर्मबंध हा नवा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कलेवर निरातिशय प्रेम करणाऱ्या जयवंत शिरोडकर नावाच्या नटाच्या आयुष्यातील द्वंद्वाची कथा असणाऱ्या या चित्रपटाला गोव्याची पाश्र्वभूमी आहे. गिरीश परदेशी आणि नंदू माधव यांच्या या चित्रपटातील भूमिका लक्षवेधी झाल्या आहेत.
दरम्यान राजर्षी शाहू स्मारक भवन येथे काल प्रदर्शित झालेल्या करेल कचिना दिग्दर्शित जंपिंग ओव्हर द पडल्स अगने या झेक चित्रपटाने रसिकांना खिळवून ठेवले. काल द एज ऑफ हेवन, संस्कार आणि स्प्रिंग, समर, फॉल, विंटर अँड स्प्रिंग या चित्रपटांचेही पुनर्प्रदर्शन करण्यात आले. अभिजात इटालियन चित्रपटांपैकी जॅक्स् ताती दिग्दर्शित मॉनआँकल या चित्रपटांचे प्रदर्शनही काल झाले. दृश्यात्मक विनोदी शैलीचा वापर असणारा हा चित्रपट अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्ड विजेता चित्रपट आहे.
महोत्सवात वार्तालाप व मुक्त संवादाच्या कार्यक्रमांतर्गत सोमवारी ८ जून रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता भारत सरकारच्या फिल्म डिव्हीजनचे संचालक कुलदीप सिन्हा, घाशीराम कोतवाल सारखे नाटक आणि सामना, उंबरठा, मुक्ता, डॉ.आंबेडकर यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याशी पत्रकार व रसिकांना संवाद साधता येणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्येच हा संवाद होणार आहे.
सोमवार ८ जून रोजी प्रदर्शित होणाचे चित्रपट
पार्वती मल्टिप्लेक्स येथे सोमवार दिनांक ८ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत डॉ.राजन गवस यांच्या कादंबरीवर आधारित व राजीव पाटील दिग्दर्शित ‘जोगवा’ या चित्रपटाचे पुनप्र्रदर्शन होणार आहे. मुक्ता बर्वे, केशव कदम व उपेंद्र लिमये हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता परेश मोकाशी दिग्दर्शित हरिश्चंद्राची फॅक्टरी या ४६ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या चित्रपटाचे पुनप्र्रदर्शन केले जाणार आहे. नंदू माधव, विभावरी देशपांडे, मोहित गोखले, अथर्व कर्वे, दिलीप जोगळेकर आदींच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
सोमवार दिनांक ८ जून रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी ९ वाजता चित्रपट प्रदर्शनाचा प्रारंभ जॅकस् ताती दिग्दर्शित मॉनआँकल या अभिजात इटालियन चित्रपटाच्या पुनप्र्रदशनाने होणार आहे.
दुपारी १२ वाजता चोमन्ना दुडी या बी.व्ही.कारंथ दिग्दर्शित अभिजात कन्नड चित्रपटाचे पुनप्र्रदर्शन होणार आहे. दुपारी २ वाजता फिल्म डिव्हीजनने तयार केलेल्या महम्मद रफी, गदिमा यांच्यावरील लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता जंपिंग ओव्हर द पडल्स अगेन हा करेल कचिना दिग्दर्शित झेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येईल. सायंकाळी ७.३० वाजता गिरीश कासारवल्ली दिग्दर्शित घटश्राध्दचे पुनप्र्रदर्शन होईल तर रात्री १०.३० वाजता द याकोबियन बिल्डिंग या मरवान हामेद दिग्दर्शित इजिप्तमधील चित्रपटांचे पुनप्र्रदर्शन होणार आहे.