Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विविध विकासकामांना कागल शहरात प्रारंभ
कागल, ७ जून / वार्ताहर

 

जयसिंग पार्क व श्रमिक वसाहत येथील सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत प्राप्त अनुदान रूपये तीन कोटी ६ लाख रूपयांतून गटारांचे बांधकाम तसेच ४० लाख रूपये खर्च करून नूतनीकरण करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीच्या कामांचा शुभारंभ नगरविकास खात्याचे राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजित कांबळे होते.
याप्रसंगी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक नितीन िदडे यांच्या हस्ते मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुश्रीफ म्हणाले, जयसिंग पार्क श्रमिक वसाहतीमधून पालिकेत मोठय़ा प्रमाणात कर मिळतो. मात्र या वसाहती गेल्या अनेक वर्षांपासून सुविधांपासून वंचित आहेत. मात्र नगरविकास खात्याचा कार्यभार आपल्याकडे आल्याने या प्रभागामधील समस्या संपुष्टात येत आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून गटर्स कामाच्या शुभारंभ झाल्याने सांडपाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कागल शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून तिसऱ्या टप्प्यासाठी ९ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ही योजना पूर्ण होताच संपूर्ण शहराला मुबलक व उच्च दाबाने पाणी मिळणार आहे. जयसिंग पार्कात सव्वा कोटींचे उद्यान तसेच पाझर तलावात नौकाविहार करण्याचा विचार असून अशा परिस्थितीत १७ जून रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी नगरसेवकांनी शिष्टमंडळे घेवून येणे हे चुकीचे असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
पोटे यांनी स्वागत करून मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रमाणेच नगरसेवक नितीन दिंडे यांनी प्रास्ताविक भाषणात या वसाहतीमध्ये झालेल्या विविध कामांची माहिती दिली.