Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मराठा समाज सेवा मंडळाच्या कारभारावरील आरोप खोटे’
सोलापूर, ७ जून / प्रतिनिधी

 

मराठा समाज सेवा मंडळाच्या आपल्या कारकीर्दीतील कामकाजाबद्दल मंडळाचे सरचिटणीस अरविंद काकडे यांनी केलेले आरोप दिशाभूल करणारे व बिनबुडाचे असल्याचा दावा मंडळाचे अध्यक्ष, माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केला.
मराठा समाजाची जुनी व नावाजलेली शिक्षण संस्था म्हणून परिचित असलेल्या मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक येत्या २८ जून रोजी होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष सपाटे यांना गेल्या १५-२० वर्षांपासून सहकार्य करणारे मंडळाचे सरचिटणीस काकडे यांनी गेल्या पंधरवडय़ात घूमजाव करून सपाटे यांची साथ सोडली आणि विरोधकांना जाऊन मिळाले. अलीकडेच त्यांनी सपाटे यांचा कारभार मनमानी, एकतंत्री आणि गैरव्यवहाराचा असल्याचा आरोप केला. हा आरोप आपल्याला जिव्हारी लागला असून काकडे यांच्यासाठी आपण अनेक नियमबाह्य़ कामे केली. आताच त्यांना आपण मनमानी कारभार करीत असल्याचा साक्षात्कार कसा झाला, असा प्रश्न सपाटे यांनी उपस्थित केला. आपण राष्ट्रवादीतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे आपल्याविरुद्ध अपप्रचाराचे रान पेटविण्यात आले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचे सपाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रत्येक काळात सूर्याजी पिसाळांची वंशावळ कार्यरत असते. त्याप्रमाणे आपल्याही समाजात ही परंपरा काही लोकांनी खांद्यावर घेतली आहे.गेल्या ५० वर्षांत संस्थेची जी प्रगती होऊ शकली नाही, ती आपण दहा वर्षांत केली. आपल्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केल्यास आपण त्याला सामोरे जाण्याचे आव्हानही त्यांनी दिले.