Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चौघांविरुध्द गुन्हा
सोलापूर, ७ जून/प्रतिनिधी

 

शेतातील विहिरीच्या पूजनाप्रसंगी सासरच्या मंडळींनी आहेर केला नाही तसेच मूलबाळ होत नाही म्हणून सासरी होणाऱ्या छळास वैतागून लक्ष्मी सुनील होळकर या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात कुमठा नाक्याजवळील हुडको कॉलनीत घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासरा व दीर या चौघाजणांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मृत लक्ष्मीचे वडील परशुराम नारायण घंटे (वय ५५, रा. जुनी गिरणी चाळ, मुरारजी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीचा विवाह सुनील अज्ञानकुमार होळकर (रा. हुडको कॉलनी, कुमठा नाका) याजबरोबर झाला होता. सुनील हा मुंबई महापालिकेत सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरीस आहे. परंतु लग्नानंतर अवघ्य तीन महिन्यातच तिचा सासरी छळ सुरु झाला.होळकर यांचे मोहोळ तालुक्यात खुनेश्वर येथे शेतजमीन असून तेथील विहिरीच्या पूजनासाठी लक्ष्मीच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना आहेर केला नाही म्हणून पती, सासू, सासऱ्यास राग होता. तिचे वडील हे गरीब रिक्षाचालक असल्याने ते लक्ष्मीच्या सासरच्या मंडळींची मागणी पूर्ण करु शकत नव्हते. यातच वांझोटी आहे म्हणून लक्ष्मीच्या छळात आणखी भर पडली. अखेर हा छळ असह्य़ झाल्याने तिने सासरीच गळफास घेऊन स्वतच्या जीवनाचा शेवट केला.
या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला तरी लक्ष्मीच्या पती, सासू, सासरा, दीर यांना अद्यापि अटक झाला नाही. ते उघड माथ्याने फिरत आहेत. पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करुन आपणास न्याय मिळवून द्यावा, अशी विनवणी मृत लक्ष्मीच्या वृध्द वडिलांनी केली आहे.