Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कडवी नदीत मोठय़ा मगरीचे दर्शन
शाहूवाडी, ७ जून/वार्ताहर

 

सरूड (ता.शाहूवाडी) येथील कडवी नदीपात्रात मगरीचे अस्तित्व असल्याचे निश्चित असून, पाच-सहा दिवसांपूर्वी मगरीची अंडी आढळून आली होती. गुरुवारी चक्क मोठय़ा मगरीचे दर्शन झाले आणि मगर पाहाण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली.
गेल्या चार वर्षांपासून मगरीचे येथे अस्तित्व आढळून येत आहे, तर सलग तीन वर्षे एकाच ठिकाणी मगरीने येथील नांगरे मळ्यात नदीकाठावर प्रजनन केले आहे. पूर्ण वाढ झालेली मादी जातीची मगर व नर जातीची मगर असे जोडपे असल्याशिवाय येथे प्रजनन होणे शक्य नाही. तीन वर्षे साधारण दहा पिलांना या मगरीने जन्म दिला आहे. सध्या अगदी लहान पिलांचेही मगरीबरोबर दर्शन होत आहे. पूर येऊनही मगर येथून आपला मुक्काम हलवत नाही हे वैशिष्टय़! अंडी घालताना ही मगर नदीकाठावर खोल खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते. उष्णतेमुळे ही अंडी परिपक्व होतात.दरम्यान, या ठिकाणास मद्रास येथील जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ निखिल व्हिटेकरी यांनी दोन वर्षांपूर्वी भेट देऊन या भागाचे निरीक्षण करून काही अनुमान काढले होते. त्यानुसार हा परिसर मगरींच्या प्रजननास व अधिवासास अत्यंत सुरक्षित असल्याचे म्हटले होते. दरम्यान, ही मगर येथे मासे, खेकडे यांच्याद्वारे आपले व पिलांचे संगोपन करते. अजूनही एवढय़ा दिवसांत मनुष्यावर हल्ला झालेला नाही. पण येथे शेतकऱ्यांनी सावधान व सतर्क राहाणे गरजेचे आहे.