Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निष्ठेपासून दूर जाण्याचे प्रकार समाजाला पोषक नाहीत - राणे
पेठवडगाव, ७ जून / वार्ताहर

 

विश्वासार्हता, निष्ठेपासून माणूस आज दूर होत स्वार्थाला जवळ केले जात आहे हे समाजाला पोषक नाही. पदावर असताना व्यक्तीचा सत्कार होतो, मात्र पदावर नसताना निरपेक्षपणाने कार्य करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सत्कार दुर्मिळच! पदाची अपेक्षा न करता निष्ठा जपत जनहिताची कामे करणाऱ्या विश्वासार्हता जपणाऱ्या अशोकराव पाटील या माझ्या मित्राचा सत्कार माझ्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कोडोली येथे बोलताना सांगून लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एक वेगळा इतिहास घडविल्याचा उल्लेखही केला.
कोडोली (ता.पन्हाळा) येथील कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोकराव पाटील (तात्या) यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्तच्या नागरी सत्कार कार्यक्रमात राणे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील होते. नारायण राणे यांच्या हस्ते गाडी, सन्मानपत्र, शाल, फेटा प्रदान करून अशोकतात्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या गौरवअंकाचे प्रकाशन राज्याचे फलोत्पादनमंत्री विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
येत्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी कायम राहून महाराष्ट्र विधानसभेवर याहीवेळी या आघाडीचीच सत्ता येईल. माझे कोणाशी वैर नाही. वेगळय़ा प्रश्नातून त्यांच्यात आणि माझ्यात भांडणे लावण्याचे काम करू नका, असे विलासराव देशमुख यांच्याबाबतच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी या कार्यक्रमानंतर बोलताना सांगून नीलेशच्या विजयानंतर पराभव पचवायची ताकद नसल्याच्या नैराश्येतून उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केल्याचे व त्याबाबत काही बोलायचे नाही, असा उल्लेख केला.
येथून पुढे मी कोणत्याही निवडणुकीला उभे न राहता राणेदादांशी निष्ठा ठेवून समाजकार्य करत राहणार असून, मला दिलेल्या गाडीचा वापर सर्वसामान्यांच्या कामासाठीच होईल, असे सत्कारमूर्ती अशोक पाटील यांनी सांगून पन्हाळा तालुक्यातील डोंगरी भागात औद्योगिक वसाहत व्हावी, कोडोली शिक्षण मंडळाला वरिष्ठ महाविद्यालयाला मंजुरी मिळावी, अशी मागणी मांडली. उद्योगधंदे, एमआयडीसी उभारणीसाठी अलीकडे शेतजमिनी द्यावयास कोणी तयार होत नाही, असा उल्लेख करत या मागणीला राणेंनी बगल मारली.
अशोकतात्यांनी कामगार क्षेत्रासह अनेक क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द केली असून, त्यांच्या या कारकीर्दीस शुभेच्छा व्यक्त करतो, असे विनय कोरे यांनी सांगून शंकरआप्पांसारख्या कार्यकर्त्यांचा आदर्श कायम ठेवावा, असे आवाहन केले. संपतबापू पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.