Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मोटारसायकली चोरांची टोळी गजाआड
इस्लामपूर, ७ जून/वार्ताहर

 

किरकोळ चैनीला लागणाऱ्या पैशांसाठी सांगली, सातारा व कोल्हापूर येथून मोटारसायकली चोरून त्या विकणाऱ्या चौघांच्या टोळीला इस्लामपूर पोलीस ठाण्यातील विशेष पोलीस पथकाने जेरबंद करून त्यांनी चोरलेल्या व विकलेल्या तब्बल ११ मोटारसायकली हस्तगत केल्या. या मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार असणारे दोघेजण इयत्ता बारावी सायन्सचे विद्यार्थी असून, त्यातील एक अनुत्तीर्ण, तर दुसरा उत्तीर्ण झाला आहे.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विविध गुन्ह्य़ांच्या तपासासाठी या आठवडय़ातच तपासकामात निष्णात असणाऱ्या पोलिसांचा समावेश असणारे एक विशेष पोलीस पथक तयार केले आहे. या विशेष पथकातील जयसिंगराव पाटील, हिंदुराव पाटील, सागर पाटील, पांडुरंग जाधव, दिलीप यादव, संदेश यादव व संतोष माने यांनी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय भास्कर कांबळे (वय १९, रा. हुबालवाडी, ता. वाळवा), अभिजित मुरलीधर खडके (वय १८, रा. इस्लामपूर), आरिफ सिकंदर मुजावर (वय ३३, रा. इस्लामपूर) व राजेंद्र दिनकर खोपडे (वय २०, रा. साखराळे, ता. वाळवा) या चौघांच्या टोळीला अटक करून त्यांनी सातारा बसस्थानक, कराड न्यायालय परिसर, सांगली, कोल्हापूर व इस्लामपूर बसस्थानक परिसरातून चोरलेल्या व परस्पर विकलेल्या एका स्कूटरसह ११ मोटारसायकली हस्तगत केल्या.
या मोटारसायकल चोरटय़ांच्या चारजणांच्या टोळीतील दोघे केवळ वाहन चोरण्याचाच उद्योग करीत होती, तर दोघांनी चोरून आणलेल्या मोटारसायकली अन्य दोघे विक्री करीत होती. मोटारसायकली चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीपैकी अजय कांबळे व अभिजित खडके हे बारावी शास्त्र शाखेत शिकणारे दोघे मोटारसायकली चोरण्यात तरबेज होते. त्यांच्याकडे वाहनाच्या कुलपाच्या १५ ते २० वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या होत्या. वाहन लावून चालक निघून जाताच प्रथम हे दोघे वाहनावर टेकून बसत व कोणाचे लक्ष नाही, हे पाहून आपल्याकडील चावीने या वाहनाचे कुलूप काढून हातोहात मोटारसायकल लंपास करीत. त्यानंतर त्या मोटारसायकलीची नंबर प्लेट काढून दुसऱ्याच नंबर प्लेट बसवून मोटारसायकल आरिफ मुजावर व राजेंद्र खोपडे यांच्या ताब्यात देत. हे दोघे मोटारसायकल विकण्यात तरबेज होते. गरजू गिऱ्हाईक शोधून केवळ सात ते आठ हजार रुपयांत मोटारसायकल विकून त्यातील दोन ते तीन हजार रुपये ते अजय कांबळे व अभिजित खडके यांना देत. या दोघांनी मोटारसायकली चोरायच्या व अन्य दोघांनी त्या विकायच्या, अशा अनोख्या पार्टनरशिपमधील हा मोटारसायकल चोरण्याचा-विकण्याचा धंदा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.
आरिफ मुजावर हा रिकामटेकडा असून, त्याची पत्नी परगावी प्राध्यापिका आहे. आपल्या पत्नीला महाविद्यालयात जाता यावे, या उदात्त हेतूने (?) चोरलेली नवी कोरी अ‍ॅक्टीव्हा स्कूटर भेट म्हणून दिली होती. यातील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आरिफ मुजावर यांच्या सासूबाई चक्क तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. अजय कांबळे हा सराईत मोटारसायकल चोरटा असून, त्याला शिराळा पोलिसांनीही अटक केली होती.